Kolhapur: नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेले पाण्याखाली; कृष्णा, पंचगंगेच्या पाणी पातळी सात फुटाने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:15 IST2025-08-20T18:13:39+5:302025-08-20T18:15:04+5:30

नागरिक स्थलांतराच्या तयारीत

Datta temple in Nrusinghwadi goes under water in Kolhapur Water level of Krishna, Panchganga rises by seven feet | Kolhapur: नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेले पाण्याखाली; कृष्णा, पंचगंगेच्या पाणी पातळी सात फुटाने वाढ

छाया-प्रशांत कोडणीकर

नृसिंहवाडी : जोरदार पावसामुळे गेल्या २४ तासात कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळी सात फुटाने वाढ झाल्याने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. आज, बुधवार सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी कोयना, राधानगरी धरणातून विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. 

कृष्णा, पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर गेल्याने मंदिरासह शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने दत्त देवस्थानमार्फत मंदिर परिसरातील सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.

वाचा- पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर केर्लीजवळ आले पुराचे पाणी; ४ राज्यमार्ग बंद

श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. तेथे त्रिकाल पूजा अर्चा चालू आहे. मंदिर परिसरातील वेदमूर्ती भैरंभट जेरे पुजारी प्रसादालय, धार्मिक विधी हॉल, दशक्रिया विधी हॉल या ठिकाणी कृष्णा व पंचगंगा नदीचे पाणी आले आहे. 

नृसिंहवाडी गावच्या तिन्ही बाजूंनी नदी असल्याने पुराच्या पाण्याच्या गावाला वेढण्यास सुरुवात झाली आहे. नृसिंहवाडी-औरवाड या मार्गावरील जुना पूल पाण्याखाली गेला असून सदर मार्गावर नवीन पुलावरून वाहतूक चालू आहे.येथील बाबर प्लॉटमधील रामनगर येथील काही भागात पाणी जाऊ लागल्याने येथील लोक स्थलांतराच्या तयारीत आहेत.

Web Title: Datta temple in Nrusinghwadi goes under water in Kolhapur Water level of Krishna, Panchganga rises by seven feet