Kolhapur: बारशाच्या कार्यक्रमात नृत्यांगना नाचवल्या; ग्रामस्थांची पोलिस ठाण्यात धाव; नृत्यांगनासह सहा जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:23 IST2025-10-16T14:22:54+5:302025-10-16T14:23:04+5:30
काहीजण अंधाराचा फायदा घेऊन पळाले

Kolhapur: बारशाच्या कार्यक्रमात नृत्यांगना नाचवल्या; ग्रामस्थांची पोलिस ठाण्यात धाव; नृत्यांगनासह सहा जण ताब्यात
दिंडनेर्ली: नंदगाव (ता.करवीर) येथे बारशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी साऊड सिस्टीम लावून नृत्यांगना नाचवल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी दोन नृत्यांगनासह सहा तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काल, बुधवारी रात्री हा प्रकार घडला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नंदगाव येथील गायरान परिसरात गेली दहा ते पंधरा वर्षांपासून व्यवसायाच्या निमित्ताने परजिल्ह्यातून दोन कुटुंबे स्थायिक झाली आहेत. यातील एका कुटुंबात बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुधवारी रात्री सार्वजनिक ठिकाणी साऊड सिस्टीम लावून गाण्याच्या तालावरती दोन तरुणींसोबत काही तरुण अश्लील नृत्य करीत होते. याचा व्हिडिओ व्हायरल होताच ग्रामस्थांतून संतापाची लाट उसळली.
गावातील तरुणांनी एकत्रित येऊन घटनास्थळाकडे मोर्चा वळविला. इतक्यात इस्पूर्ली पोलिसांना याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक मुद्दसर शेख यांनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळावरुन दोन नृत्यांगनासह सहा तरुणांना ताब्यात घेतले. काहीजण अंधाराचा फायदा घेऊन पळाले.
पोलिस कॉन्स्टेबल अनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रणजित शंकर पोवार (वय ३०), मिथुन शंकर पोवार (४०), अनिल शंकर पोवार (२४, रा. नंदगांव), राजकुमार सोन्या चव्हाण (३५ रा. टोप संभापूर), सचिन नरसु पवार (२४ रा. वारणा कोडोली), राहुल साहेबराव जाधव (२२ रा. कवठे शिरुर ता. वाई) यांचे सह नाचणाऱ्या दोन तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल मधुकर शिंदे करीत आहेत.