चुटकीवाल्या भोंदूबाबाला ठाण्यातून अटक; गैरप्रकारांचा होणार उलगडा, महिला ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 12:59 IST2025-11-23T12:59:29+5:302025-11-23T12:59:42+5:30
भूतबाधा आणि करणीची भीती घालून लोकांना गंडा घालणारा आणि एका महिलेला घेऊन पळालेला चुटकीवाला भोंदूबाबा सनी रमेश भोसले याला अखेर करवीर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली.

चुटकीवाल्या भोंदूबाबाला ठाण्यातून अटक; गैरप्रकारांचा होणार उलगडा, महिला ताब्यात
कोल्हापूर : भूतबाधा आणि करणीची भीती घालून लोकांना गंडा घालणारा आणि एका महिलेला घेऊन पळालेला चुटकीवाला भोंदूबाबा सनी रमेश भोसले (रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर) याला अखेर करवीर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. रविवारी (दि. २३) न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली. त्याच्या चौकशीतून अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जादूटोणा करून करणी काढण्याचे आमिष दाखवत चुटकीवाला भोंदू बाबा सनी भोसले याने शहरात बस्तान बसवले होते. क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकातील चिवा बाजार येथे त्याचा दरबार भरत होता. याच दरबारातून त्याने करणी केल्याची भीती घालून काही लोकांची आर्थिक लूट केली. तसेच एका महिलेला फूस लावून पळवून नेले होते. याबाबत गुन्हा दाखल होताच करवीर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू झाला. चार दिवसांच्या शोधानंतर शनिवारी (दि. २२) रात्री तो ठाणे पश्चिम येथील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये सापडला. गुन्हे शोध पथकातील हवालदार विजय तळसकर यांच्यासह सुजय दावणे आणि रणजीत पाटील यांनी त्याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
महिला ताब्यात
भोंदूबाबा शहरातील एका महिलेला घेऊन पळाला होता. ती महिला त्याच्यासोबत राहत होती. पोलिसांनी महिलेलाही ताब्यात घेतले. तिच्या इच्छेनुसार तिचा ताबा पतीकडे द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती करवीर पोलिसांनी दिली.
पोलिसांची चाहूल लागताच पळाला
गेल्या पाच महिन्यांपासून त्याने सातारा जिल्ह्यातील वाई येथे तळ ठोकला होता. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तो वाईतून निघून गेला. गेल्या आठवड्यापासून तो ठाणे येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.