संगणक खरेदी प्रकरणांवरून दावे-प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:30+5:302021-02-05T06:56:30+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे याआधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी १६७ संगणक आणि प्रिंटरची केलेल्या खरेदीप्रकरणी ...

Counter-claims from computer purchase cases | संगणक खरेदी प्रकरणांवरून दावे-प्रतिदावे

संगणक खरेदी प्रकरणांवरून दावे-प्रतिदावे

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे याआधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी १६७ संगणक आणि प्रिंटरची केलेल्या खरेदीप्रकरणी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. हेतू कितीही चांगला असला, तरी मित्तल यांनी राबवलेली प्रक्रिया चुकीची असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे वेगवान कामासाठी चांगले संगणक द्यावेत, अशी आमची मागणी पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाच लॅपटॉप खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव मित्तल यांच्याकडे सादर केला होता. मात्र त्यावर दोन पानांची टिप्पणी लिहून १६७ संगणक आणि तेवढेच प्रिंटर घेण्याचा प्रस्ताव त्यांनी कार्यकारी अभियंता मनीष पवार यांना तयार करण्यास सांगितला. त्यानंतर ७ दिवसांच्या मुदतीचे ई-टेंडर काढून जीएम पोर्टलवरून ही खरेदी करण्यात आली. बाराही पंचायत समित्यांसह मुख्यालयात संगणक जोडण्यातही आले आहेत.

हा सगळा प्रकार झाल्यानंतर मग पदाधिकाऱ्यांना कुणकुण लागली आणि खळबळ उडाली. सर्व पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना जाब विचारला; परंतु हा विषय माझ्याकडे आलाच नाही. यातील मला काहीही माहिती नाही. माझी कुठेही सही नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेली दोन वर्षे बाराही पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांकडून संगणकांची मागणी सुरू होती. परंतु त्यासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. जिल्हा परिषदेचे कामकाज गतिमान होण्यासाठी संगणक आवश्यक होते. त्यानुसार शासकीय नियमानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असलेल्या कार्यकक्षेतच ही खरेदी करण्यात आली आहे. यासाठी जलव्यवस्थापन समितीची मंजुरी आवश्यक नाही, असा दावा मित्तल यांनी केला आहे.

कोट

संगणक खरेदीचा हेतू चांगला असू शकतो. परंतु त्याची जी प्रक्रिया राबवली आहे, ती चुकीची आहे. जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी आवश्यक संगणक खरेदीला कोणीच विरोध केला नसता. परंतु ज्या पध्दतीने ही खरेदी झाली आहे, ती चुकीची आहे. वेळ पडल्यास याच्या चौकशीची मागणी करणार आहे.

सतीश पाटील

उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

कोट

गटविकास अधिकारी आणि मुख्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी संगणकांची मागणी केली होती. अनेक ठिकाणी जुने संगणक होते. गतिमान कामकाजासाठीची संगणकांची आवश्यकता असल्याने जीएम पोटर्लवरूनच संगणकांची खरेदी केली आहे.

अमन मित्तल

माजी मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Counter-claims from computer purchase cases