CoronaVirus News : कुटुंबनियोजन कार्यक्रमाला बसला कोरोनाचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 07:36 IST2020-05-23T01:49:30+5:302020-05-23T07:36:09+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अत्यावश्यक सेवेशिवाय इतर वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. गर्भनिरोधक साधनांचा मोठा तुटवडा देशात जाणवत आहे.

CoronaVirus News : कुटुंबनियोजन कार्यक्रमाला बसला कोरोनाचा झटका
- पोपट पवार
कोल्हापूर : कोरोनाचा कुणाला कसा फटका बसला याचे वेगवेगळे किस्से आता बाहेर येत आहेत. उद्योजक, नोकरदार, मजुरांसह सर्वांना आर्थिक फटका बसला असला, तरी सरकारच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमालाही त्याचा ‘जोर का झटका’ बसला आहे. लॉकडाऊन काळात दोन कोटी ५६ लाख जोडप्यांपर्यंत गर्भनिरोधके न पोहोचल्याने या कार्यक्रमाचे लक्ष्य २० टक्क्यांनी मागे राहील. २३ लाख महिलांची इच्छा नसताना गर्भधारणा होईल, आठ लाखांवर असुरक्षित गर्भपात होतील, असा निष्कर्ष दिल्लीतील फाउंडेशन फॉर रिप्रोडक्टिव हेल्थ सर्व्हिसेस इंडिया (एफआरएचएस) या संस्थेने काढला आहे.
केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अत्यावश्यक सेवेशिवाय इतर वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. गर्भनिरोधक साधनांचा मोठा तुटवडा देशात जाणवत आहे. जर ही स्थिती सप्टेंबरपर्यंत पूर्वपदावर आली नाही तर देशातील अडीच कोटींपेक्षा अधिक दाम्पत्यांपर्यंत गर्भनिरोधके पोहोचणार नाहीत, परिणामी, २३ लाख महिला इच्छा नसताना गर्भवती राहण्याचा अंदाज ‘एफआरएचएस’ने वर्तविला आहे; शिवाय, लॉकडाऊनची स्थिती अशीच राहिली, तर गर्भपात करण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध होणार नाही. परिणामी, इच्छा नसताना गर्भ राहिल्याने आठ लाखांपेक्षा अधिक महिला असुरक्षित गर्भपात करून घेतील, अशी भीती आहे.
दरम्यान, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी देशात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असली, तरी लॉकडाऊनमुळे सहा लाखांपेक्षा अधिक दाम्पत्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करता येणार नाहीत; शिवाय देशात सध्या कंडोमचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.
परिणामी, २३ लाख ९५ हजार महिलांना इच्छेविरोधात गर्भ ठेवावा लागणार आहे. किंवा त्यांची नकळत गर्भधारणा होऊ शकते. यामुळे देशात सहा लाख ७९ हजार ८६४ अतिरिक्त बाळांचा जन्म होणार आहे. यामुळे सरकारने सुरू केलेल्या कुटुंबनियोजन कार्यक्रमालाही ‘खो’ बसणार आहे. गर्भनिरोधक साधनांचा उपयोग न केल्याने १० लाखांपेक्षा अधिक अतिरिक्तगर्भपात होण्याची भीतीही ‘एफआरएचएस’ने व्यक्त केली आहे. यामध्ये आठ लाख ३४ हजार असुरक्षित गर्भपात, तर प्रसूती काळात दीड हजारांपेक्षा अधिक गर्भवतींचा मृत्यू होण्याचा धोका आहे.
लॉकडाऊन उठल्यानंतर रुग्णालयांवर ताण
लॉकडाऊन उठल्यानंतर वा शिथिल झाल्यानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया आणि गर्भनिरोधक गोळ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होऊ शकते. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मागणी झाल्यास त्यांची ही मागणी पूर्ण करताना आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन काळात गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. इच्छेविरुद्ध गर्भ राहिल्याने पुढील काळात असुरक्षित गर्भपातही मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. सरकारी पातळीवरच यासाठी जनजागृती आवश्यक आहे.
-डॉ. राजीव चव्हाण,
स्त्रीरोगतज्ज्ञ, कोल्हापूर.