'शक्तिपीठ'ची सुपारी घेतलेले कंत्राटदारांचे कैवारी, बैठकीत राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:36 IST2025-02-21T12:35:47+5:302025-02-21T12:36:22+5:30

'पालकमंत्री आबिटकर व मंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगण्याचे धाडस करावे'

Contractors who took the betel nut for Shaktipith protest, Rajesh Kshirsagar criticized without mentioning his name in the meeting | 'शक्तिपीठ'ची सुपारी घेतलेले कंत्राटदारांचे कैवारी, बैठकीत राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता टीका

'शक्तिपीठ'ची सुपारी घेतलेले कंत्राटदारांचे कैवारी, बैठकीत राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता टीका

कोल्हापूर : ज्यांची एक गुंठाही जमीन शक्तिपीठ महामार्गात जाणार नाही, ज्यांचा शेती, मातीशी संबंध नाही, अशांनाच शक्तिपीठ महामार्ग हवा आहे. कंत्राटदारांची बैठक घेऊन या महामार्गाची सुपारी फोडणारे वर्षभरापासून कुठे होते, लोकच त्यांना शोधत होते, या शब्दांत शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांसह नेत्यांनीही नाव न घेता आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर तोंडसुख घेतले.

आमदार क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दिले होते. त्याचे पडसाद गुरुवारच्या बैठकीत उमटले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच समन्वयक गिरीश फोंडे यांनी ज्यांच्या शक्तिपीठाशी संबंध नाही अशांनी आता या महामार्गाची सुपारी घेतल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना शक्तिपीठ नको आहे, मात्र, काहींनी या महामार्गासाठी कंत्राटदारांची बैठक बोलवून काय साध्य केले. ज्यांना वर्षभरापूर्वी लोक शोधत होते ते आता याची सुपारी फोडत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनीही क्षीरसागर यांचा नामोल्लेख टाळत त्यांना टोले लगावले. ते म्हणाले, ज्यांची एक गुंठाही जमीन शक्तिपीठ महामार्गात जात नाही, शेतीशी ज्यांचा संबंध नाही असे लोक शक्तिपीठ महामार्ग पाहिजे म्हणून ओरडत आहेत हे हास्यास्पद आहे.

परस्परविरोधी भूमिका कशासाठी

पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे महामार्ग होणार नाही असे सांगतात तर त्यांच्याच पक्षाचे शहरातील आमदार शक्तिपीठाचे समर्थन करतात. त्यामुळे नेमकी सत्ताधाऱ्यांची भूमिका काय हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान सतेज पाटील यांनी दिले.

शक्तिपीठात फितुरी नको म्हणून..

कणेरीवाडीचे आनंदराव भोसले यांनी शक्तिपीठाचा विषय कोर्टात मांडण्याची सूचना केली. यावर आमदार सतेज पाटील मराठा आंदोलनापासून ते राज्यातील वेगवेगळ्या घटनांचा पट उलगडत त्यात ज्या पद्धतीने फितुरी झाली तसा अनुभव या आंदोलनात होऊ नये म्हणून शक्तिपीठ महामार्गाचा लढा रस्त्यावरच लढण्याची आग्रही भूमिका मांडली. त्याला सर्वच शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली.

मुंबईत जाऊन विरोध कळवा

पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठाला विरोध असल्याचे कोल्हापुरात सांगण्यापेक्षा थेट मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना हे सांगण्याचे धाडस करावे, असा सल्ला विजय देवणे यांनी दिला.

Web Title: Contractors who took the betel nut for Shaktipith protest, Rajesh Kshirsagar criticized without mentioning his name in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.