बिनविरोधसाठी नेत्यांची मनधरणी

By Admin | Updated: September 1, 2015 00:14 IST2015-09-01T00:14:30+5:302015-09-01T00:14:30+5:30

शेतकरी संघाचे राजकारण : विरोधी आघाडीचीही मोर्चेबांधणी सुरू

Congratulations for unanimous leaders | बिनविरोधसाठी नेत्यांची मनधरणी

बिनविरोधसाठी नेत्यांची मनधरणी

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संघाच्या विद्यमान संचालक मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची मनधरणी सुरू केली असून, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. शेतकरी संघाच्या १९ जागांसाठी १७९ अर्ज दाखल झाले असून, बिनविरोधसाठी संघाच्या विद्यमान संचालक मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या निवडणुकीतही सत्तारूढ गटाने नेत्यांच्या सहकार्याने बऱ्यापैकी जागा बिनविरोध करण्यात यश मिळविले होते. या वेळेलाही त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत; पण संघाची आर्थिक स्थिती काहीशी भक्कम झाल्याने माजी संचालकांनी नव्याने मोट बांधण्याची तयारी केली आहे. तशा हालचाली सुरू केल्या असून, सत्तारूढ गटानेही नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेत बिनविरोधसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
सोमवारी संघाचे अध्यक्ष वसंतराव मोहिते, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते, माजी महापौर शिवाजीराव कदम, दिलीप पाटील मुरगूडकर, यशवंत पाटील, टाकवडेकर, युवराज पाटील, आदींनी जिल्हा बॅँकेत जाऊन आमदार मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह विविध नेत्यांशीही त्यांनी चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, विद्यमान संचालक जुनेच पॅनेल ठेवून निवडणूक बिनविरोध करा असे म्हणत असतील तर ते कसे शक्य आहे अशी विचारणा विरोधी संचालकांतून केली जात आहे. संघाचे माजी अध्यक्ष पी. डी. पाटील, माजी संचालक सुरेश देसाई, ए. वाय. साळोखे, विजय पोळ, धनाजीराव सरनोबत, जी. डी. पाटील, भादोलेचे माने यांनी एकत्रित येऊन पर्याय देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मतदारांच्या भेटीगाठीही त्यांनी सुरू केल्या आहेत. त्यामुळे किमान निम्मे जागांवर विरोधकांना संधी मिळणार असेल तरच निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र आहे; परंतु तशी शक्यता फारच धूसर दिसत आहे. (प्रतिनिधी)

विरोधकांची निम्म्या जागांची मागणी

Web Title: Congratulations for unanimous leaders