भाजपसोबत इमानदारी दाखवण्याची शिंदे-अजित पवार यांच्यात स्पर्धा, प्रकाश आंबेडकर यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:20 IST2025-12-18T12:19:46+5:302025-12-18T12:20:50+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जाहीर आरोप केले

भाजपसोबत इमानदारी दाखवण्याची शिंदे-अजित पवार यांच्यात स्पर्धा, प्रकाश आंबेडकर यांची बोचरी टीका
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात भाजपसोबत इमानदारी दाखवण्याची रेस (स्पर्धा) लागली आहे, अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा चौकात झालेल्या संकल्प महासभेत ते बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जाहीर आरोप केले. ते म्हणाले, भाजप, संघ हे सर्व पक्ष संपवत आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपला एकनाथ शिंदे हवे आहेत. पण, अजित पवार यांची राष्ट्रवादी नको, अशी सध्याची भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिका निवडणुकीत ३० ते ४० जागा घ्या आणि गप्प बसा, असेही भाजप म्हणेल.
महापालिका निवडणुकीत भाजपने मताला पाच हजार रुपये दर काढला आहे. एका कुटुंबात पाच मतदार असतील तर २५ हजार देईल आणि लोकशाही मसणात घालेल. बिहार निवडणुकीत काट्याची टक्कर होईल, असे म्हटले जात होते. पण, प्रत्यक्षात निकाल एकतर्फी लागले. निवडणुकांत हेराफेरी केली जात आहे. देशातील विरोधी पक्ष दुबळा झाला आहे. संसदेत सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवत नाही.
सत्ताधारी आमच्या विरोधात बोलला, आमचे बिंग बाहेर काढले तर तुमचे स्वातंत्र्य काढून घेऊ. तुमच्या फाईली बाहेर काढून तिहार जेलमध्ये घालू, अशी धमकी दिली जात आहे. म्हणून देशात सुरू असलेल्या लुटीच्या विरोधात कोणीही बोलत नाहीत. हे असेच सुरू राहिले तर लोकशाही धोक्यात येणार आहे. पुन्हा राजेशाही आली तर देश भीतीच्या छायेत जाईल.
अरुण सोनवणे यांनी महापालिकेच्या सर्व जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. इम्तियाज नदाफ यांनी महापालिकेवर आंबेडकरीवादी झेंडा लागेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी डॉ. क्रांती सावंत, इम्तियाज नदाफ, बाबुराव ऐवाळे, सोमनाथ साळुुंखे, जनार्दन गायकवाड यांची भाषणे झाली. सिध्दार्थ कांबळे यांनी आभार मानले.
मनपाची निवडणूक बंटी, बबलीमध्ये
ॲड. आंबेडकर म्हणाले, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकारण सांभाळून घेणारे आहे. येथील महापालिकेची निवडणूकही बंटी आणि बबली यामध्ये होणार आहे. म्हणून येथील महापालिकेच्या सर्व जागा वंचित बहुजन विकास आघाडी लढवणार आहे.