रंकाळा, गडहिंग्लज, चंदगडमधील नमुन्यांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:26+5:302021-01-20T04:24:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: बर्ड फ्लूसदृश आजारामुळे अलर्ट झोन जाहीर केलेल्या रंकाळा, गडहिंग्लज व चंदगडमधील तुर्केवाडी येथील बाधित पक्षी ...

Collection of specimens from Rankala, Gadhinglaj, Chandgad | रंकाळा, गडहिंग्लज, चंदगडमधील नमुन्यांचे संकलन

रंकाळा, गडहिंग्लज, चंदगडमधील नमुन्यांचे संकलन

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: बर्ड फ्लूसदृश आजारामुळे अलर्ट झोन जाहीर केलेल्या रंकाळा, गडहिंग्लज व चंदगडमधील तुर्केवाडी येथील बाधित पक्षी व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य पक्ष्यांच्या स्राव नमुन्यांचे संकलन सुरू आहे. दोन दिवसांत पुण्यातील प्रयोगशाळेकडे ते पाठविले जाणार आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी पाठविलेल्या सहा पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बर्ड फ्लूची कोणतीही लागण नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

रंकाळ्यात पक्षी मेल्याचे आढळल्यानंतर बर्ड फ्लूचेच बळी असल्याची अफवा उठली. पशुसंवर्धन, वन विभागाने एकत्रितपणे तातडीने हे बाधित पक्षी प्रयोगशाळेकडे पाठविले. रंकाळ्यातील दोन बदके, शहरातील एक कबूतर, गडहिंग्लजमधील दोन कावळे व चंदगड तुर्केवाडी येथील एका कावळ्याच्या नमुन्याचा पाठविलेल्या पक्ष्यांमध्ये समावेश आहे. हे सर्व पक्षी मृत आढळल्याने पूर्ण पक्षीच पाठविले होते. काही प्रमाणात जिवंत असलेल्या पक्ष्यांचे चोचीतून स्राव घेऊन ते तपासणीसाठी पाठविले जात आहेत.

दरम्यान, पक्षी मृत आढळल्याने बर्ड फ्लूच्या भीतीने रंकाळा, गडहिंग्लज व तुर्केवाडी हा भाग अलर्ट झोन जाहीर केला आहे. तेथील बाधित पक्षी सापडलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटरच्या अंतरातील पोल्ट्री फार्म, परसातील काेंबड्या यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यातील काही पक्ष्यांचे चोचीतून स्राव संकलनाचेही काम सुरू आहे. आज, बुधवारी हे संकलन पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी ते तपासणीसाठी पाठविले जातील, असे पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण यांनी सांगितले.

Web Title: Collection of specimens from Rankala, Gadhinglaj, Chandgad