थंडीचा कडाका आणखी पाच दिवस, कोल्हापुरात १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला पारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:22 IST2025-11-18T12:21:22+5:302025-11-18T12:22:02+5:30
सध्याची थंडी कशामुळे?

थंडीचा कडाका आणखी पाच दिवस, कोल्हापुरात १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला पारा
कोल्हापूर : सध्या जाणवत असलेली कडाक्याची थंडी पुढील पाच दिवस म्हणजे शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर (मार्गशीर्ष प्रतिपदा) पर्यंत अशीच थंडी जाणवणार आहे.
कोल्हापुरात सोमवारी पहाटे पाच वाजता कमाल २८.६ आणि किमान १३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले आहे. हे तापमान सरासरीपेक्षा १.६ इतक्या अंश सेल्सिअसने खालावले आहे. त्यामुळे लगतच्या परिसरात तीव्र थंडीची लाट जाणवत आहे. शहरात आणि लगतच्या परिसरात थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.
सध्याची थंडी कशामुळे?
सध्या उत्तर भारतात एकापाठोपाठ पश्चिमी झंजावात नाही. दोन पश्चिमी झंजावात काही दिवसांच्या गॅपमुळे, अगोदरच झालेल्या बर्फ वृष्टीवरून ताशी २५ ते ३० किमी वेगाने पूर्व दिशेकडून पूर्वीय अतिथंड वारे उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे झेपावत आहे, शिवाय राज्यात आकाश निरभ्र आहेच. याशिवाय महाराष्ट्र सहित संपूर्ण वायव्य भारतात हवेच्या दाबात ४ ते ६ हेक्टापास्कलने वाढ होवून १०१६ ते १०१८ हेक्टापास्कल अशा एकसमान आणि एकजिनसी हवेच्या दाब उत्तर भारताबरोबर सध्या महाराष्ट्रातही जाणवत आहे. त्यामुळे हवेच्या घनतेत वाढ होत आहे, त्यामुळे हे वातावरण सध्या चौफेर थंडीला अनुकूल आहे.
शनिवारपासून थंडी थोडी कमी होणार
वारा वहन पॅटर्नमध्ये होणाऱ्या बदलातून शनिवार दि. २२ नोव्हेंबरपासून सध्यापेक्षा केवळ काही अंशी थंडी कमी होण्याची शक्यता निवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.