सत्तेच्या राजकारणात वर्चस्वाचे दावे-प्रतिदावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:33+5:302021-01-20T04:25:33+5:30
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या निमित्ताने राजकीय पक्षांकडून सत्तेचा दावा केला जात आहे. २३ गावांत यड्रावकर ...

सत्तेच्या राजकारणात वर्चस्वाचे दावे-प्रतिदावे
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या निमित्ताने राजकीय पक्षांकडून सत्तेचा दावा केला जात आहे. २३ गावांत यड्रावकर गटाकडून वर्चस्वाचा दावा करण्यात आला आहे. तर १५०हून अधिक ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून आल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. स्वाभिमानीने तीन गावात स्वबळावर, तर १३ ठिकाणी स्थानिक आघाडीबरोबर सत्तेत असल्याचे स्पष्ट केले आहे. एकूणच वर्चस्वाचे दावे-प्रतिदावे केले जात असलेतरी विकासकामांसाठी आता सर्वांनीच पुढे येण्याची गरज आहे.
मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बारा गावात सत्तांतर तर पंधरा गावांत सत्ताधाऱ्यांना यश मिळाले. अनेक प्रस्थापितांना या निवडणुकीत धक्का बसला आहे. अशा राजकीय परिस्थितीत वर्चस्वाचे दावे गटातटाबरोबर राजकीय पक्षाकडून केले जात आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात यड्रावकर गटाबरोबरच काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही बळ मिळाले आहे. सत्तेच्या सारिपाटात गावपुढाऱ्यांनी आपली ताकद दाखविली असलीतरी तालुक्याच्या नेत्यांनी त्यांना आता विकासासाठी पाठबळ देणे तितकेच गरजेचे आहे.
ग्रामपंचायतीचा हा निकाल नेत्यांना राजकीय ताकद देणारा ठरला असलातरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास साधला जातो. निवडून येणाऱ्या प्रत्येक सदस्याकडून प्रभागातील नागरिकांना विकासाच्या अपेक्षा असतात. राजकीय पक्षांकडून सत्तेचा दावा केला जात असलातरी गावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकासकामांचा डोंगर उभा करावा, अशीच माफक अपेक्षा मतदारांकडून व्यक्त केली जात आहे.
चौकट - विकासकामांचे आव्हान
निवडणुकीत अनेक गट, संघटनांनी सत्तेच्या खुर्चीसाठी सोयीचे राजकारण केले. काहींना यश तर काहींना अपयश आले असलेतरी निवडणुकीतील राजकारण, ईर्ष्या, राग निवडणुकीपुरते ठेवून गावच्या विकासाला महत्त्व देणे गरजेचे आहे.