ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 08:55 IST2025-08-17T08:54:28+5:302025-08-17T08:55:10+5:30
गेल्या ४२ वर्षांच्या लढ्यानंतर अखेर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच

ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे रविवारी दुपारी साडेतीन वाजता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मेरी वेदर ग्राउंडवर उद्घाटन समारंभ होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे प्रमुख पाहुणे आहेत, तर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली समारंभहोणार आहे.
कोल्हापूरसाठी ऐतिहासिक क्षण
सर्किट बेंचचे उद्घाटन हा कोल्हापूरसाठी ऐतिहासिक क्षण आहे. अनेक वर्षांचे स्वप्न साकार होत असल्याने हा क्षण आनंदाने साजरा केला जात आहे.
स्वप्न उतरले सत्यात
गेल्या ४२ वर्षांच्या लढ्यानंतर अखेर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंचचे स्वप्न सत्यात उतरत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फीत कापून सीपीआरसमोरील सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन होईल. या समारंभासाठी सहा जिल्ह्यांतून सुमारे पाच हजार जण उपस्थित राहणार आहेत. यात सहा जिल्ह्यांतील मंत्री, लोकप्रतिनिधी, आजी-माजी न्यायाधीश, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वकील, पक्षकार आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असेल.