Chanda tigress: चंदा वाघिणीवर कॉलर आयडीच्या माध्यमातून देखरेख राहणार, दहा एकरचे कुंपण केले तयार; गर्भवती आहे की नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:18 IST2025-11-15T12:15:45+5:302025-11-15T12:18:14+5:30
२७ तासांनंतर चंदा पोहोचली सह्याद्रीत, डरकाळी फोडून गेली अधिवासात

Chanda tigress: चंदा वाघिणीवर कॉलर आयडीच्या माध्यमातून देखरेख राहणार, दहा एकरचे कुंपण केले तयार; गर्भवती आहे की नाही?
कोल्हापूर : जवळपास ८५० किलोमीटरचे अंतर २७ तासात पार करून ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंदा वाघिणीला (एसटीआर टी ०४) शुक्रवारी पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी सुरक्षित अशा खास वेगळ्या पिंजऱ्यातून मुक्त केले.
चांदोली अभयारण्याच्या सोनार्ली येथील एनक्लोजरमध्ये “सॉफ्ट रिलीज” पद्धतीने जरी चंदाला सोडले असले तरी वनविभागाने लावलेल्या कॉलर आयडीच्या माध्यमातून तिच्यावर देखरेख राहणार आहे. डरकाळी फोडून चंदाने आपल्या अस्तित्त्वाची दखल घेण्यास भाग पाडत लक्ष वेधून घेतले. वन विभागाने सुरू केलेल्या “ऑपरेशन तारा” मोहिमेअंतर्गत ताडोबातील या वाघिणीला आधी एअरलिफ्ट करण्यात येणार होते.
पण, ते शक्य न झाल्याने खास वाहनाने रस्ते मार्गाने सह्याद्रीत आणले आहे. चंद्रपूर येथील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे यांनी वाघिणीची प्रकृती तपासल्यानंतर तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच तिला मुक्त करण्यात आले, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी दिली.
दहा एकर कुंपण तयार
वाघाच्या स्थलांतरणासाठी २००८ पासूनच तयारी सुरू होती. सह्याद्रीत २०२२-२३मध्ये ५० चितळसह सांबर अशा तृणभक्षी प्राण्यांची जोपासना करण्यात आली आहे. यासाठी सुमारे दहा एकरचे कुंपण तयार केले आहे. डिसेंबर २०२३मध्ये स्थलांतर करून आणलेला एक वाघ येथे मुक्कामी आहे. कोयना अभयारण्यात एक आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानात दोन असे तीन वाघ आता येथे आहेत.
वाघिण गर्भवती आहे की नाही
वाघिणीला जेव्हा पकडले तेव्हा ती गर्भवती आहे की नाही, याची तपासणी केलेली नव्हती. अशी तपासणी करता येत नाही. पण, सोनोग्राफी करून त्या वाघिणीची चाचणी करता आली असती. तिच्या एकूण शारीरिक बदलावरून ती गर्भवती आहे की नाही, हे ओळखता येते. त्यामुळे आता ही वाघिण गर्भवती आहे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.