Kolhapur: पन्हाळ्यात ‘जनसुराज्य’ला रोखण्याचे आव्हान; शिंदेसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:52 IST2025-07-22T17:51:24+5:302025-07-22T17:52:17+5:30

काही ठिकाणी बंडखोरी होणार

Challenge to stop Janasurajya in Panhala taluka in Zilla Parishad Panchayat Samiti elections Attention to the role of Shinde Sena BJP Congress NCP | Kolhapur: पन्हाळ्यात ‘जनसुराज्य’ला रोखण्याचे आव्हान; शिंदेसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष 

Kolhapur: पन्हाळ्यात ‘जनसुराज्य’ला रोखण्याचे आव्हान; शिंदेसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष 

सरदार चौगुले

पोर्ले तर्फ ठाणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील नेत्यांनी जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात ‘जनसुराज्य’ला विरोध म्हणून महाविकास आणि महायुतीच्या नेत्यांनी मोट बांधण्याची तयारी केली आहे. आमदार विनय कोरे यांच्या सूक्ष्म नियोजनाला विरोधक कसे उत्तर देतात, याकडे तालुक्याचे लक्ष आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट, तर पंचायत समितीचे बारा गण आहेत. प्रारूप रचनेत बदल न झाल्याने इच्छुकांनी नि:श्वास टाकला आहे. आमदार विनय कोरे यांच्या पक्षाची प्रत्येक मतदारसंघात ताकद आहे. बेरजेच्या राजकारणामुळे जनसुराज्यमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची पक्षाकडून अपेक्षा आहे. माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यासह डॉ. जयंत पाटील यांच्याशी त्यांचे राजकीय सख्य आहे. पन्हाळ्याच्या पश्चिम भागात शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे वर्चस्व आहे. 

गतवेळी सत्तेत नसताना नरके यांनी एका जिल्हा परिषदेसह, चार जागा पंचायत समितीच्या जिंकल्या होत्या. आता ते सत्तेबरोबर आहेत. भाजप तीन जागांवर लढण्याच्या तयारीत असला, तरी त्यांचे कोणाशी कसे गणित जुळते, यावरच पुढील राजकारण अवलंबून आहे. तडजोडीच्या राजकारणात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तालुक्यात इतर पक्ष संघटनांची ताकद ज्या-त्या मतदारसंघात निर्णायक ठरत असल्याने निवडणुकांचे आखाडे बांधताना याचा विचार करावा लागणार आहे.

गतवेळचे बलाबल

जिल्हा परिषद ६ जागा

  • जनसुराज्य पक्ष - ३
  • बाबासाहेब पाटील (अजित पवार) - १
  • भाजपा - १
  • चंद्रदीप नरके (शिंदेसेना) - १


पंचायत समिती १२ जागा

  • जनसुराज्य पक्ष - ८
  • महाविकास आघाडी - ४


जनसुराज्यची शक्ती

गतवेळी जनसुराज्याने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सर्वच जागा लढवल्या होत्या. भाजपने मैत्रिपूर्ण लढतीत यवलुज मतदारसंघातून विजय मिळवला होता. जनसुराज्यच्या विरोधात शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, उद्धवसेनेचे सत्यजित पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, काॅंग्रेसचे अमर पाटील, डाॅ. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी केली होती. तर पी. एन. पाटील गट स्वतंत्र लढला होता. जनसुराज्यने पंचायत समितीच्या ८, तर जिल्हा परिषदेत ३ जागा जिंकून तालुक्याच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण केले होते.

समीकरणे बदलली..

राज्याच्या सत्ता पालटानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. ‘गोकुळ’चे संचालक अमर पाटील यांनी विधानसभेला विनय कोरे यांना उघड पाठिंबा देऊन जिल्हा परिषदेचा शब्द घेतल्याची चर्चा आहे. भाजपने युती धर्म पाळत करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांना विधानसभेला मदत केल्याने मतदारसंघात भाजपला जागा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांची जिल्हाध्यक्ष पदामुळे राजकीय ताकद वाढल्याने उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

आरक्षणावर चित्र

सत्तेत असणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना विजयाची खात्री वाटत आहे. आरक्षण सोडतीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभेत शब्द दिलेल्या मतदारसंघात उलटसुलट आरक्षण पडले, तर उमेदवाराची घोषणा करताना नेत्यांची कसोटी, तर नाराजांची मनधरणी करताना दमछाक होणार आहे.

Web Title: Challenge to stop Janasurajya in Panhala taluka in Zilla Parishad Panchayat Samiti elections Attention to the role of Shinde Sena BJP Congress NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.