Maratha Reservation :'आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच'; शाहू छत्रपती, अजित पवार यांच्यात तासभर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 12:17 IST2021-06-14T11:59:14+5:302021-06-14T12:17:56+5:30
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्य जबाबदारी केंद्र सरकारचीच असली तरी राज्य सरकारने त्यांच्या आखत्यारित बसणाऱ्या मराठा समाजाच्या सर्व मागण्याही तात्काळ मान्य केल्या पाहिजेत, अशी आग्रही भूमिका सोमवारी शाहू छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडली.

Maratha Reservation :'आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच'; शाहू छत्रपती, अजित पवार यांच्यात तासभर चर्चा
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्य जबाबदारी केंद्र सरकारचीच असली तरी राज्य सरकारने त्यांच्या आखत्यारित बसणाऱ्या मराठा समाजाच्या सर्व मागण्याही तात्काळ मान्य केल्या पाहिजेत, अशी आग्रही भूमिका सोमवारी शाहू छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडली.
मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या हेतूने स्थापन केलेल्या सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या सारख्या संस्था सक्षम करण्याची व त्यांना स्वायत्तता देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून ती पार पाडावी, अशी अपेक्षाही शाहू छत्रपतींनी यावेळी व्यक्ती केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी कोल्हापुरात आले होते, शासकिय बैठका सुरु होण्यापूर्वीच सकाळी नऊ वाजता पवार थेट न्यू पॅलेसवर गेले. त्यांनी शाहू छत्रपतींची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशराजे, उद्योगपती व्ही. बी. पाटील उपस्थित होते.
पवार यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले असले तरी खासदार संभाजीराजे यांचे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शाहू छत्रपती यांची भूमिका जाणून घेण्यासाठीच पवार न्यू पॅलेसवर गेले होते. दोघांमध्ये सुमारे तासभर मराठा आरक्षणातील प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली.
केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार आपली भूमिका टाळू शकत नाही. मराठा समाजाने ज्या काही मागण्या केल्या आहेत, त्या राज्य सरकारशीही निगडीत आहेत. त्यावर देखिल राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी. या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या संस्थांना सक्षम करुन त्यांना स्वायत्तता द्यावी, असे शाहू छत्रपतींनी सांगितले.
सकाळी न्यू पॅलेसवर पवार मालोजीराजे, मुधरिमाराजे यांच्याशीही पवार यांनी चर्चा केली. शाहू छत्रपती व अजित पवार यांच्यातील चर्चा संपल्यानंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांच्याशीही पवार यांनी चर्चा केली. यावेळी माणिक मंडलिक देखिल उपस्थित होते.