SSC, HSC Exam: बोर्ड परीक्षेसाठी यंदा ३२४ केंद्रांच्या वर्गखोलीत सीसीटीव्हीतून देखरेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 11:55 IST2026-01-12T11:55:06+5:302026-01-12T11:55:29+5:30
उर्वरित २१५ केंद्रांवर दहा दिवसांत बसवणार कॅमेरे : केंद्रसंचालक, कर्मचाऱ्यांची अदलाबदल

संग्रहित छाया
कोल्हापूर : दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर विभागातील एकूण ५३९ परीक्षा केंद्रांपैकी ३२४ केंद्रांवरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. बारावीचे हॉल तिकीट आज, सोमवारपासून उपलब्ध होणार आहे. यंदाच्या बोर्ड परीक्षांसाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य केले आहेत. उर्वरित २१५ केंद्रांवर दहा दिवसांत कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले आहेत. विभागस्तरावर ९,७४६ वर्गखोल्यांची आवश्यकता असून पैकी ४,०२६ खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. हे प्रमाण ६६ टक्के आहे.
प्रत्येक केंद्रावरील फुटेज जतन करण्यात येणार असून संवेदनशील केंद्रांवरील ऑनलाईन फुटेज जिल्हाधिकारी आणि जिल्हा दक्षता समितीकडे दिले जाणार आहे.
परीक्षा नियंत्रणासाठी राज्य व विभागीय मंडळ स्तरावर कक्ष होणार असून गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा सर्व परीक्षा केंद्रांवरील केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार आहे, तसेच संबंधित केंद्राव्यतिरिक्त इतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. नियोजनबद्ध परीक्षांसाठी "बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे" या पुस्तिकेची निर्मिती केल्याची माहिती विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.
विभागात १० वी साठी ३६२, १२ वी साठी १७७ केंद्रे
चालू वर्षी इयत्ता १० वी साठी ५ आणि १२ वी साठी १ अशी ६ केंद्र आहेत. विभागीय कार्यकक्षेत एकूण ५३९ केंद्रे असून त्यापैकी १० वी साठी ३६२, तर १२ वी साठी १७७ केंद्रे आहेत.
१० वी साठी १,३२,६९१, १२ वी साठी १,१६,५३५ अर्ज
इयत्ता १२वी साठी २१ जानेवारी, तर १० वी साठी ३० जानेवारीपर्यंत अतिविशेष अतिविलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. १० जानेवारीअखेर विभागीय मंडळात इयत्ता १० वी साठी १,३२,६९१, तर इयत्ता १२ वी साठी १,१६,५३५ परीक्षार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.
परीक्षेची सर्वसमावेशक तयारी सुरू आहे, शाळा स्तरावरील तयारीची पाहणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. -राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय मंडळ.