Kolhapur Crime: इन्स्टाग्रामवरून मुलींना करायचा ब्लॅकमेल, पुण्यातील हॉटेलमधून संशयिताला ताब्यात घेतलं, पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:29 IST2026-01-06T12:28:52+5:302026-01-06T12:29:37+5:30
भुदरगड पोलिसांची कारवाई

संग्रहित छाया
गारगोटी : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मुलींची छायाचित्रे मॉर्फ करून अश्लील संदेश पाठवणे, धमकावणे तसेच शरीरसुख व पैशांची मागणी करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला भुदरगड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. पीडित मुली अथवा पालकांनी तक्रार न दिल्याने नाइलाजाने पोलिसांनी त्याला सोडून दिले.
भुदरगड तालुक्यातील काही गावांतील मुलींना अज्ञात व्यक्तीकडून इन्स्टाग्रामवर सातत्याने त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी तालुका संरक्षक अधिकारी विनायक चव्हाण यांना प्राप्त झाल्या होत्या. संशयित आरोपी बनावट आयडी तयार करून मुलींच्या सोशल मीडियावरील छायाचित्रांचे अश्लील पद्धतीने मॉर्फिंग करीत होता. त्यानंतर कॉल व संदेशांद्वारे धमकावणे, भेटीस भाग पाडणे आणि पैशांची मागणी असे प्रकार सुरू होते.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तालुका संरक्षण अधिकारी विनायक चव्हाण यांनी तातडीने कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधला. सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने भुदरगड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी तपास हाती घेतला. इन्स्टाग्रामवरील तांत्रिक माहिती व आयपी ॲड्रेसच्या आधारे आरोपीचे अचूक ठिकाण निश्चित करण्यात आले.
आरोपी पुण्यातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे समजताच विशेष पथकाने छापा मारून सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. संशयित आरोपीचा मोबाइल जप्त करून पुढील सखोल तांत्रिक तपासासाठी कोल्हापूर सायबर सेलकडे पाठविण्यात आला आहे.
“न्याय मिळविण्यासाठी तक्रार आवश्यक आहे. पालकांनी व पीडितांनी धाडसाने पुढे येऊन गुन्हा दाखल करावा. आरोपीवर कडक कारवाई आणि शिक्षा होण्यास मदत मिळेल,” असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक गोरख चौधर यांनी केले आहे.