Kolhapur Crime: बनावट सोने ठेवून बँकेला ८३ लाखांचा गंडा, सराफासह सातजणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:05 IST2025-11-10T12:04:45+5:302025-11-10T12:05:35+5:30
तारण सोने मूल्यांकन करणाऱ्या सराफानेच इतरांच्या नावे घेतले कर्ज

संग्रहित छाया
कोल्हापूर : राजारामपुरीतील चौथ्या गल्लीतील वैश्य बँकेसाठी तारण सोने मूल्यांकनाचे काम करणारा सराफ दीपक गोपाळ देवरुखकर (रा. सणगर गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर) याने पत्नीसह सहा जणांच्या नावे बनावट सोने तारण ठेवून बँकेला ८३ लाख ३६ हजारांचा गंडा घातला. हा प्रकार जुलै ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडला.
याबाबत बँकेचे शाखा व्यवस्थापक नीरज शिवाजी देशमुख (वय ३८, रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांनी शनिवारी (दि. ८) रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सराफ देवरुखकर याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीरज देशमुख हे राजारामपुरीतील वैश्य बँकेत व्यवस्थापक आहेत. याच बँकेत दीपक देवरुखकर हा सराफ तारण सोने मूल्यांकनाचे काम करीत होता. त्याने गेल्या चार महिन्यांत पत्नीसह सहा जणांच्या नावे सोने तारण ठेवून बँकेतून ८३ लाख ३६ हजारांचे कर्ज घेतले. तारण सोन्याचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी स्वत:कडेच असल्याने त्याने बनावट सोने खरे असल्याचे भासवून त्यावर कर्ज घेतले. बँकेच्या अंतर्गत तपासणीत हा प्रकार उघडकीस येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सराफ देवरुखकर याच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार शाखा व्यवस्थापकांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
यांच्यावर गुन्हा दाखल
सराफ देवरुखकर याच्यासह त्याची पत्नी दीपा देवरुखकर (दोघे रा. सणगर गल्ली, मंगळवार पेठ), सुरेखा सुरेश डावरे, संग्राम भीमराव पाटील (दोघे रा. रणदिवे गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर), आराध्या बाळासो जाधव (रा. रेंदाळ, ता. हातकणंगले), संजय दत्तात्रय पिसाळे आणि विक्रम अशोक डंबे (दोघे रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. कर्जदारांचा या गुन्ह्यातील सहभाग तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खासगी सावकारीचा संशय?
सराफ देवरुखकर याने चार महिन्यांत ८३ लाखांचे कर्ज घेतले. यातील किती पैसे त्याने स्वत:साठी वापरले? कर्ज मिळवून दिल्यानंतर तो कर्जदारांकडून कमिशन घेत होता काय? इतरांच्या नावे घेतलेल्या कर्जावर तो खासगी सावकारी करीत होता काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तसेच त्याला लवकरच अटक करणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
स्वत:च दिले बनावट दागिने
सराफ देवरुखकर हा मे २०११ पासून वैश्य बँकेच्या पॅनलवर तारण दागिने मूल्यांकनाचे काम करीत होता. बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्याने स्वत:च्या पत्नीसह इतरांची खाती सुरू केली. त्यानंतर स्वत:कडील बनावट दागिने त्यांच्याकडे देऊन त्यांच्या नावे तारण कर्ज घेतले. कर्जाची रक्कमही स्वत:च वापरल्याची माहिती समोर येत असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक रूपेश इंगळे यांनी सांगितले.