चोरी करणारच होता, तोपर्यंतच..; कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिरातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:05 IST2025-07-18T16:05:12+5:302025-07-18T16:05:34+5:30
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरी झाली नसल्याचे स्पष्ट झाले

चोरी करणारच होता, तोपर्यंतच..; कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिरातील प्रकार
कोल्हापूर : बिनखांबी गणेश मंदिरात गुरुवारी सायंकाळी एका तरुणाने दानपेटीतील रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र पुजारी आल्याचे दिसताच पळून गेला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरी झाली नसल्याचे स्पष्ट झाले.
शहरातील अंबाबाई मंदिर बाह्य परिसरात भरचौकात असलेल्या बिनखांबी गणेश मंदिरात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मंदिरातील पुजारी दहा मिनिटांसाठी बाहेर गेले होते. तोपर्यंत १८ ते २० वर्षे वयोगटातील एक तरुण दानपेटीजवळ येऊन बसला. दानपेटीतील रक्कम काढण्याचा प्रयत्न करणार होताच; पण तोपर्यंत पुजारी आले. त्यांना बघताच तरुण पळून गेला.
ही माहिती कळताच सचिव शिवराज नाईकवाडे यांनी मंदिराला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र काही चोरल्याचे आढळले नाही. मात्र अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती नाईकवाडे यांनी दिली.