सहायक कामगार आयुक्त पतीकडून प्राध्यापिक पत्नीचा हुंड्यासाठी छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:41 IST2026-03-31T13:41:08+5:302026-03-31T13:41:37+5:30
कोल्हापूर : पत्नीचा छळ केल्याप्रकरणी सहायक कामगार आयुक्त नीलेश लक्ष्मण येलगुंडे (वय ४२, रा. लांबोटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर ...

सहायक कामगार आयुक्त पतीकडून प्राध्यापिक पत्नीचा हुंड्यासाठी छळ
कोल्हापूर : पत्नीचा छळ केल्याप्रकरणी सहायक कामगार आयुक्त नीलेश लक्ष्मण येलगुंडे (वय ४२, रा. लांबोटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्यासह नातेवाइकांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गेल्या १० वर्षांपासून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हुंड्याची मागणी करत त्रास दिल्याचा उल्लेख प्राध्यापिका पत्नीने फिर्यादीत केला आहे.
पतीसह सासरा लक्ष्मण प्रल्हाद येलगुंडे, सासू सुवर्णा लक्ष्मण येलगुंडे, नणंद नम्रता येलगुंडे (तिघेही रा. लांबोटी) आणि मावस दीर रावसाहेब नरोटे (रा. पोखरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
पुणे येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना झालेल्या ओळखीतून फिर्यादी प्राध्यापिका आणि नीलेश यांचा प्रेमविवाह झाला. लग्नानंतर सासरच्या नातेवाइकांनी हुंड्यासाठी छळ सुरू केला. वारंवार पैसे घेऊन शारीरिक, मानसिक त्रास दिला. पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत, असा उल्लेख फिर्यादींनी त्यांच्या जबाबात केला आहे.
सततच्या त्रासाला कंटाळून त्या सात वर्षीय मुलासह वेगळ्या राहतात. त्यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला असून, पतीसह एकूण पाचजणांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीची पडताळणी करून संशयित आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली.