‘गडहिंग्लज’च्या नगराध्यक्षपदी अरुणा शिंदेंची निवड निश्चित

By Admin | Updated: July 5, 2015 00:50 IST2015-07-05T00:50:33+5:302015-07-05T00:50:33+5:30

औपचारिकता बाकी : शिंदे व बोरगावे यांच्यात होणार लढत

Aruna Shinde's election as the president of 'Gadhinglj' | ‘गडहिंग्लज’च्या नगराध्यक्षपदी अरुणा शिंदेंची निवड निश्चित

‘गडहिंग्लज’च्या नगराध्यक्षपदी अरुणा शिंदेंची निवड निश्चित

गडहिंग्लज : अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने ज्येष्ठ नगरसेविका अरुणा शिंदे यांचा अर्ज ठेवला. दुसऱ्या इच्छुक उमेदवार सरिता गुरव यांचा अर्ज मागे घेण्यात राष्ट्रवादीला यश आले. त्यामुळे आता केवळ निवडणुकीची औपचारिकताच बाकी राहिली आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्षा अरुणा शिंदे यांना पुन्हा एकदा नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळेल.
गडहिंग्लज पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नऊ, तर विरोधी जनता दल-जनसुराज्य-काँग्रेस आघाडीचे आठ नगरसेवक आहेत. काठावरील बहुमत आणि एका जागेसाठी दोघी इच्छुक असल्यामुळे नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, गुरव यांनी स्वत:हून माघार घेतल्याने शिंदेच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.
सकाळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची कागल येथे आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळीही शिंदे व गुरव या दोघींचा दावा कायम राहिला. त्यामुळे त्यांनी पुन्हा त्यांच्यावरच निर्णय सोपविला. पहिल्यांदा संधी आपल्याला मिळावी या मागणीवर शिंदे या अखेरपर्यंत आग्रही राहिल्या. मात्र, नेते मुश्रीफ यांचा मान-सन्मान राखण्यासाठी उमेदवारी माघार घेण्याची तयारी गुरव यांनी दाखविली. त्यामुळेच दोन महिन्यांपासून अनिर्णित राहिलेला तिढा सुटला.
दुपारी गडहिंग्लजला येऊन मुख्याधिकारी तानाजी नरळे यांच्याकडे माघारीचा अर्ज दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शिंदे व जनता दलाचे राजेश बोरगावे यांच्यात लढत होईल. मंगळवारी (दि. ७) रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष निवडीसाठी नगरपालिकेची खास सभा होणार आहे.
८-१० चा फॉर्म्युला !
अरुणा शिंदेंना ८ महिन्यांसाठी तर सरिता गुरव यांना १० महिने नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. ही पूर्व अट मान्य केल्यानंतरच तसा ‘शब्द’ घेऊनच शिंदेना पहिली संधी देण्यात आली. त्यानुसार ३१ जानेवारी २०१६ रोजी मुदत संपताच त्या राजीनामा देतील, त्यानंतर गुरव यांना संधी देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Aruna Shinde's election as the president of 'Gadhinglj'