Kolhapur: अरुण डोंगळेंचे बंड, गोकुळ दूध संघात सतेज-मुश्रीफ यांना हादरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:33 IST2025-05-15T13:31:41+5:302025-05-15T13:33:09+5:30
‘महायुती’च्या कार्डचा वापर : दूधाला राजकारणाची उकळी

Kolhapur: अरुण डोंगळेंचे बंड, गोकुळ दूध संघात सतेज-मुश्रीफ यांना हादरा
कोल्हापूर : ‘गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिल्याने सत्तारूढ गटाला जोरदार हादरा बसला आहे. डोंगळे यांच्या भूमिकेवर आता वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. नियमाप्रमाणे संघाची मासिक बैठक गुरुवारी होणार आहे.
चार वर्षांपूर्वी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके आदींना सोबत घेऊन माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार दिवंगत पी. एन. पाटील यांच्याकडून सत्ता काढून घेतली होती. त्यानंतर सत्तारूढ गटातून बाहेर पडलेल्या ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांना प्रत्येकी दोन-दोन वर्षे अध्यक्षपदाची संधी दिली.
डोंगळे यांची मुदत २५ मे रोजी संपत असून, तत्पूर्वी राजीनामा देण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी दिल्या आहेत. पण, अध्यक्ष डोंगळे यांचे महायुतीच्या नेत्यांसाेबतचे घनिष्ठ संबंध आणि त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द, व्यवहार पाहता, ते राजीनामा देणार नाहीत, अशीच चर्चा गेली सहा महिने ‘गोकुळ’च्या वर्तुळात सुरू होती. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून ‘महायुती’चे कार्ड पुढे केल्याने सत्तारूढ गटासमोर पेच निर्माण झाला आहे.
मुश्रीफ यांचे सुतोवाच..
‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत अरुण डोंगळे यांनी महादेवराव महाडिक व आमदार दिवगंत पी. एन. पाटील यांच्या विरोधात उघड बंद केल्याने ते कधीही कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचा अंदाज नेत्यांना आहे. त्यामुळेच संघाच्या दीड महिन्यांपूर्वी झालेल्या दूध उत्पादकांच्या सत्कार समारंभात मंत्री हसन मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे व विश्वास पाटील यांना आगामी निवडणुकीत एकत्र राहा, असा सल्ला दिला होता.
‘गोकुळ’मधील बलाबल..
महायुती (१०) : अरुण डोंगळे, अजित नरके, शौमिका महाडिक, अंबरीश घाटगे, एस. आर. पाटील, अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेेंगे, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील.
महाविकास आघाडी (०८) : विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, शशिकांत पाटील-चुयेकर, डॉ. चेतन नरके, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर.
हसन मुश्रीफ समर्थक (०३) : नवीद मुश्रीफ, प्रा. किसन चौगले, रणजितसिंह पाटील.