Navratri 2025: आम्ही अंबेचे सेवेकरी: भाविकांच्या सुरक्षेचा वसा हीच सेवा; कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरांमध्ये पोलिसांची करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 19:11 IST2025-09-24T19:08:47+5:302025-09-24T19:11:13+5:30
नवरात्रोत्सवात राबतात सुमारे ८०० पोलिस

Navratri 2025: आम्ही अंबेचे सेवेकरी: भाविकांच्या सुरक्षेचा वसा हीच सेवा; कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरांमध्ये पोलिसांची करडी नजर
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव उत्साहात आणि कोणत्याही विघ्नाशिवाय पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील तीर्थस्थळांवर सुमारे ८०० पोलिस राबत आहेत. वाहतुकीपासून ते मंदिरात भाविकांच्या रांगांपर्यंत पोलिसांची करडी नजर असते. केवळ कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून नव्हे, तर देवीची सेवा म्हणून घेतलेला हा सुरक्षेचा वसा पोलिसांकडून दरवर्षी श्रद्धेने पार पाडला जातो.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या तीर्थक्षेत्री काम करण्याची संधी मिळाली हेच अनेकांसाठी भाग्याचे असते. त्यामुळेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून ते अंमलदारांपर्यंत अनेकांच्या व्हॉट्सॲप स्टेटसला रोज करवीरनिवासिनी अंबाबाईची प्रतिमा असते. रोज किंवा दर शुक्रवारी न चुकता दर्शनाला मंदिरात हजेरी लावणारे, पालखी सोहळ्याला उपस्थिती लावणारे अनेक अधिकारी, कर्मचारी भेटतात. नवरात्रौत्सवातील सुरक्षा व्यवस्था हे कर्तव्य असते, तशीच ती त्यांच्यासाठी सेवेची पर्वणीही असते. त्यामुळेच सुरक्षाव्यवस्था, बंदोबस्त, वाहतूक नियोजन अशा कामांमध्ये आपलाही सहभाग असावा, असे पोलिसांना मनोमन वाटते.
अंबाबाई मंदिरासह नवदुर्गा, जोतिबा मंदिर, बाळूमामा मंदिरातही भाविकांची गर्दी असते. या सर्वच ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यापासून ते भाविकांना विनासायास दर्शन मिळावे, यासाठी पोलिस राबतात. नवरात्रोत्सवात सुमारे ८०० पोलिस या कामात आहेत.
सुरक्षेसाठी २४ तास सतर्क
अंबाबाई मंदिर सुरक्षेसाठी २४ तास पोलिस कार्यरत असतात. बॉम्बशोधक पथकाकडून नियमित तपासणी केली जाते. सर्व प्रवेशद्वारांवर कडेकोट बंदोबस्त तैनात असतो. दर्शनरांग आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची विशेष नजर असते. पालखी सोहळा, ललिता पंचमीची यात्रा, देवीच्या नगरप्रदक्षिणेसाठी पोलिस अधीक्षकांसह इतर वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थिती लावतात. यातून त्यांची श्रद्धा आणि कर्तव्यभावनेचा मिलाप दिसून येतो.
वाहतूक नियोजनाची सेवा
नवरात्रौत्सवात बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यांच्या वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. वाहनांचे पार्किंग आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस विशेष परिश्रम घेतात. गर्दीच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवणे ही सेवाच असल्याची भावना पोलिसांकडून व्यक्त केली जाते.