Kolhapur Crime: दारू पिऊन एकत्र जेवण तयार करताना भाजी चिरण्यावरुन वाद, मित्राचा चाकून भोसकून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:45 IST2025-11-25T11:45:32+5:302025-11-25T11:45:59+5:30
हल्लेखोरास जागेवरूनच अटक

Kolhapur Crime: दारू पिऊन एकत्र जेवण तयार करताना भाजी चिरण्यावरुन वाद, मित्राचा चाकून भोसकून खून
कोल्हापूर : दारू पिऊन एकत्र जेवण तयार करताना भाजी चिरण्याच्या वादातून परप्रांतीय मजुराचा चाकूने भोसकून त्याच्या मित्रानेच खून केला. मंगल मांझी (वय ३५, सध्या रा. संभापूर, ता. हातकणंगले, मूळ रा. ओडिसा) असे मृताचे नाव आहे. हल्लेखोर देवाश्री प्रफुल्ल चंदन (२६, सध्या रा. संभापुर, मूळ रा. ओडिसा) याला शिरोली एमआयडीसी घटनास्थळावरून ताब्यात घेऊन अटक केली. खुनाची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संभापूर येथे घडली.
शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल मांझी आणि देवाश्री चंदन हे दोघे एकमेकांचे मित्र आणि शेजारी असून गेल्या वीस वर्षांपासून संभापूर परिसरात राहतात. दोघेही विवाहित आहेत. त्यांचे कुटुंबीयही सोबत असते. दोघे गवंडी काम आणि मजुरीची कामे करतात. सोमवारी सुट्टी असल्यामुळे त्यांनी घरात एकत्र जेवणाचा बेत कला होता. भाजी कोणी चिरायची, यावरून झालेल्या वादातून चंदन याने भाजी चिरण्याच्या चाकूने मांझी यांना भोसकले.
वर्मी घाव लागल्याने मांझी यांचा जागीच मृत्यू झाला. महिलांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.
हल्लेखोरास जागेवरूनच अटक
दारूच्या नशेतील हल्लेखोर देवाश्री चंदन याला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील चाकू पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी चंदन याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुरू होती.