कोल्हापूर चित्रनगरीसाठी आणखी १५ कोटी, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:09 IST2025-09-19T12:09:11+5:302025-09-19T12:09:40+5:30
पुढील महिन्यात कामे सुरू करू : लवकरच विशेष चित्रपट प्रशिक्षण केंद्र

कोल्हापूर चित्रनगरीसाठी आणखी १५ कोटी, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
कोल्हापूर : कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. येथील चित्रनगरीच्या ७८ एकर जागेत आणखी १५ कोटी रुपयांची कामे पुढील महिन्यात सुरू होतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी येथे केली.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि कोल्हापूर चित्रनगरीतर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार शाहू छत्रपती होते. चित्रनगरीतील विविध सेट उभारणी आणि विकासकामे यासाठी हा निधी खर्च करण्यात येईल, तसेच याच ठिकाणी विशेष चित्रपट प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले.
भविष्याचा वेध घेऊन, व्यापक दृष्टिकोन ठेवत बाबूराव पेंटर यांनी चित्रनगरीला प्रगत बनवले. यापुढे देशभरातील चित्रीकरणाचे करवीरनगरी हे केंद्र ठरेल, त्यातून स्थानिक निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांना रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'चित्रनगरी : कोल्हापूरच्या विकासाचे महाद्वार' या विषयावरील चर्चासत्रात या चित्रनगरीचे पर्यटनस्थळ होऊ देऊ नका, असा सूर वक्त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.