Kolhapur Crime: चिमुकलीला तुझ्या पप्पा'कडे सोडतो म्हणून घेवून गेला, अन् उसाच्या शेतात नेत अत्याचाराचा प्रयत्न केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:40 IST2025-12-01T15:40:03+5:302025-12-01T15:40:35+5:30
पोलिसांनी कागल हायवेजवळील एका बांधकामा ठिकाणी नराधमास ताब्यात घेतले

Kolhapur Crime: चिमुकलीला तुझ्या पप्पा'कडे सोडतो म्हणून घेवून गेला, अन् उसाच्या शेतात नेत अत्याचाराचा प्रयत्न केला
दिंडनेर्ली: लग्न समारंभासाठी गेलेल्या ओळखीतीलच एकाने सहा वर्षाच्या चिमुकलीला तुझ्या पप्पा'कडे सोडतो असे सांगून दुचाकीवरून घेऊन जात उसाच्या शेतात अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घडली. मुलीने ओरडून प्रतिकार केला असता तोंडांत कापडाचा बोळा घालून मारहाण केली. तसेच कुणाला काही सांगितले तर तुझ्या पप्पांना मारून टाकणार अशी धमकी दिली.
अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास इस्पूर्ली पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून चार ते पाच तासांत अटक केली. विकास आनंदा कांबळे (वय २८ वर्षे, शिवनेरी नगर, शांतीनगर शेवटचा बस स्टॉप, पाचगाव) असे त्याचे नाव आहे. करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव ते कात्यायनी मार्गावरती असणाऱ्या उसाच्या शेतात काल, रविवारी प्रकार घडला. ओळखीतीलीच एकाने चिमुकलीवरती अतिप्रसंग करण्याच्या घृणास्पद प्रकाराने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित मुलीचे कुटुंब व आरोपी हे एकमेकाचे ओळखीचे असून पाचगावमध्ये एकाच गल्लीत राहतात. एका लग्न समारंभासाठी हे सर्वजण दऱ्याचे वडगाव ते कात्यायनी मार्गावरील एका हॉलवर गेले होते. तेव्हा आरोपी विकास कांबळे याने चिमुकलीस तुझे पप्पा तिकडे गेले आहेत, त्यांच्याकडे सोडतो असे सांगून दुचाकीवरून कात्यायनी परिसरात असलेल्या उसाच्या शेतात नेले. याठिकाणी चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. चिमुकलीने त्याला ओरडून प्रतिकार केला तेव्हा तिच्या तोंडांत कापडाचा बोळा घालून मारहाण केली. कुणाला काही सांगितले तर तुझ्या पप्पांना मारून टाकणार अशी धमकीही दिली.
यानंतर आरोपीने चिमुकलीला हॉलच्या बाजूस सोडून पलायन केले. दरम्यान तिच्या आई -वडिलांनी चिमुकलीचा शोध घेत होते. चिमुकली दिसताच तिची परिस्थिती पाहून तिला उपचारासाठी सी.पी.आर रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. आरोपीकडे मोबाईल नाही, स्वतःची दुचाकी नाही अशा परिस्थितीत त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते.
इस्पूर्ली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मुद्दसर शेख व करवीर पोलिस पथकाने शर्थीचे प्रयत्न करून कागल हायवेजवळील एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नराधमास ताब्यात घेतले. याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.