Kolhapur Local Body Election Results 2025: स्थानिक आघाड्यांचा 'धुरळा'! कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपरिषदांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:20 IST2025-12-21T15:17:16+5:302025-12-21T15:20:20+5:30
Kolhapur Nagaradhyaksha Winners Name List: नेत्यांनी स्थानिक सोयीच्या आघाड्या केल्याने राजकीय पक्षांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या

Kolhapur Local Body Election Results 2025: स्थानिक आघाड्यांचा 'धुरळा'! कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपरिषदांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? वाचा...
Kolhapur Nagaradhyaksha Winners List: जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. नगराध्यक्षपदी भाजपच्या २, शिंदेसेना २, जनसुराज्य पक्षाने २ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या २ उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर उर्वरीत पाच ठिकाणी स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी मिरवणुका काढण्यावर प्रशासनाने बंदी घातली होती. मात्र अनेक ठिकाणी समर्थकांनी जल्लोष साजरा करीत प्रशासनाचा आदेश धुडकावला.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात २ डिसेंबरला चुरशीने ७८.८७ टक्के मतदान झाले होते. तेरा नगराध्यक्षपदासाठी ५६ उमेदवार व २५४ नगरसेवकपदांसाठीच्या ८०० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. नेत्यांनी स्थानिक सोयीच्या आघाड्या केल्याने राजकीय पक्षांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या.
‘जयसिंगपूर’मध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, भाजपचे सावकार मादनाईक यांच्या आघाडीला उद्धवसेनेने पाठिंबा दिला होता. याठिकाणी शाहू विकास आघाडीचे संजय पाटील यड्रावकर विजयी झाले. तेच भाजप शिरोळात मात्र आमदार पाटील यांच्याविरोधात ‘जनसुराज्य’चे आमदार अशोकराव माने यांच्या सोबत एकत्र आली होती. येथे शिवशाहू आघाडीच्या योगिता कांबळे (शिवशाहू आघाडी-पृथ्वीराज यादव,राजू शेट्टी,गणपतराव पाटील) विजयी झाल्या.
‘गडहिंग्लज’मध्ये काँग्रेस, शिंदेसेना, भाजप एकत्र लढले मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महेश तुरबतमठ यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारली आहे. तर ‘हुपरी’ व ‘मूरगूड’, ‘चंदगड’मध्ये भाजप, शिंदेसेना एकत्र लढली होती. येथे चंदगडमध्ये भाजपचे सुनील काणेकर, हुपरीत मंगळराव माळगे तर मुरगूडमध्ये शिंदेसेनेच्या सुहासिनी पाटील नगराध्यक्षपदी निवडून आल्या. मुरगूडमध्ये शिंदेसेना व भाजपच्या आघाडी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उतरली होती.
कागलात राष्ट्रवादी काँग्रेस व समरजीत घाटगे गटाच्या आघाडीसमोर शिंदेसेना उभी आहे. मात्र याठिकाणी मुश्रीफ-घाटगे गटाने विरोधकांचा धुव्वा उडवला. अन् राष्ट्रवादी-शाहू आघाडी सविता माने नगराध्यक्षपदी निवडून आल्या. आजऱ्यात भाजप-शिंदेसेना पुरस्कृत ताराराणी आघाडीचे अशोक चराटी विजयी झाले. त्यांच्यासमोर शिंदेसेना, भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवसेनेने आव्हान उभे होते.
कोल्हापूर नगराध्यक्ष विजयी उमेदवार - (Kolhapur Nagaradhyaksha Winners Name List)
१.जयसिंगपूर : संजय पाटील यड्रावकर : शाहू विकास आघाडी
२.मुरगूड : सुहासिनी पाटील : शिंदेसेना
३.कागल : सविता माने (राष्ट्रवादी-शाहू आघाडी)
४.वडगाव : विद्याताई पोळ (काँग्रेस पुरस्कृत यादव आघाडी)
५.शिरोळ : योगिता कांबळे (शिवशाहू आघाडी-पृथ्वीराज यादव,राजू शेट्टी,गणपतराव पाटील)
६.पन्हाळा : जयश्री पोवार (जनसुराज्य पक्ष)
७.गडहिंग्लज : महेश तुरबतमठ (राष्ट्रवादी)
८.चंदगड : सुनील काणेकर (भाजप)
९.कुरुंदवाड : मनीषा डांगे (शाहू आघाडी - यड्रावकर)
१०.मलकापूर (जि.कोल्हापूर) : रश्मी कोठावळे : जनसुराज्य, भाजप, दलित महासंघ आघाडी)
११.हातकणंगले : अजितसिंह पाटील (शिंदेसेना)
१२.हुपरी : मंगळराव माळगे (भाजप)
१३.आजरा : अशोक चराटी (भाजप-शिंदेसेना पुरस्कृत ताराराणी आघाडी..)