Kolhapur: अकलूज खंडणीप्रकरणी दोघांना अटक; सहायक फौजदारासह दोघांचा शोध सुरू, पोलिस दलात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:47 IST2025-10-01T15:46:54+5:302025-10-01T15:47:13+5:30
कारनाम्यांच्या चर्चेला उधाण

Kolhapur: अकलूज खंडणीप्रकरणी दोघांना अटक; सहायक फौजदारासह दोघांचा शोध सुरू, पोलिस दलात खळबळ
कोल्हापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील गुन्हेगारांच्या टोळीवरील मोक्काची कारवाई रद्द करून घेण्यासाठी ६५ लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीतील दोघांना अकलूज पोलिसांनी अटक केली. समीर पानारी आणि सतीश सावंत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या गुन्ह्यातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे याच्यासह अन्य दोघांचा अकलूज पोलिसांकडून शोध सुरू आहे. खंडणीखोरांच्या टोळीत सहायक फौजदाराचा समावेश असल्याचे समोर आल्याने कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
अकलूज येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील १३ जणांवर मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे आला होता. हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी समीर अब्बास पानारी (वय ३५, रा. महावीरनगर, हुपरी, ता. हातकणंगले) याने अकलूजमधील प्रदीप माने यांना फोन करून ६५ लाखांची मागणी केली होती. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पानारी याच्या चौकशीतून सतीश सावंत, सहायक फौजदार मिलिंद नलावडे, कमलेश कानडे आणि लाला ऊर्फ लालासाहेब अडगळे यांची नावे समोर आली होती.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील समीर पानारी आणि सतीश सावंत यांना अटक केली आहे. इतर तिघांचा शोध सुरू आहे. अकलूज पोलिसांची पथके त्यांच्या मागावर असून, लवकरच खंडणीखोरांना अटक होण्याची शक्यता आहे. या टोळीने आणखी काही लोकांकडून खंडणी उकळल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागणी केली तरीही गुन्हा
या गुन्ह्यात खंडणीखोरांनी प्रत्यक्ष खंडणी स्वीकारली नसून केवळ मागणी केली आहे. कारवाईची भीती घालून खंडणी मागणे हा गुन्हा आहे. यात पोलिसाचा सहभाग असल्याने स्वत: विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
टोळीवर झाली मोक्काची कारवाई
ज्या टोळीवरील मोक्काची कारवाई रद्द करण्यासाठी ६५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती, त्या टोळीवर २२ सप्टेंबर २०२५ रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली. त्यामुळे खंडणीखोरांचे पितळ उघडे पडले आहे.
विरोधी टोळीच्या फिर्यादीकडे खंडणीची मागणी
खंडणीखोरांचा खंडणी वसुलीचा डाव सुरुवातीपासून फसल्याचे दिसत आहे. मुंबईतील कमलेश कानडे याच्या माहितीवरून त्यांनी प्रदीप माने यांना खंडणीसाठी फोन केला. मात्र, माने हे विरोधी टोळीतील असल्याची कल्पना खंडणीखोरांना नव्हती. त्यानेही बोलण्यात अडकवून खंडणीखोरांवर सापळा रचला.
डिजिटल फ्रॉडप्रमाणे खंडणी उकळण्याचा हा प्रकार सुरू होता. खंडणीची मागणी केल्याचे निष्पन्न होताच गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. अशी तोतयेगिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सर्व दोषींवर कडक कारवाई होईल. - सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक