अजित पवार यांनी कोल्हापुरात घेतलं होतं महाविद्यालयीन शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:41 IST2026-01-29T12:40:18+5:302026-01-29T12:41:01+5:30

Ajit Pawar Death in Plane Crash: 'पूरग्रस्त दौरे' कायमचे आठवणीत राहणारे आहेत.

Ajit Pawar had done his college education in Kolhapur | अजित पवार यांनी कोल्हापुरात घेतलं होतं महाविद्यालयीन शिक्षण

अजित पवार यांनी कोल्हापुरात घेतलं होतं महाविद्यालयीन शिक्षण

कोल्हापूर : महापूर असो वा कोरानाचे संकट, जिल्ह्याच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजित पवार मदतीसाठी धावून आले होते. जुलै २०२१ मध्ये शिरोळ तालुक्याला महापुराने वेढले होते. जनजीवन विस्कळीत झालेले असताना पवार यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयात उभारलेल्या पूरग्रस्त निवारा केंद्राला त्यांनी भेट दिली होती. संकट काळात धावून येणारा नेता म्हणून शिरोळच्या जनतेच्या आठवणीत त्यांचे हे 'पूरग्रस्त दौरे' कायमचे आठवणीत राहणारे आहेत.

भुदरगड तालुक्यात माजी आमदार के. पी. पाटील हे अजितदादांचे निकटवर्तीय मानले जात. मुदाळ येथे २३ मे २०२५ रोजी के. पी. पाटील यांच्या 'घरवापसी' निमित्त आयोजित सभेला अजितदादा उपस्थित होते. सभेदरम्यान अचानक पाऊस सुरू झाला. मात्र, पावसाची तमा न बाळगता अजितदादांनी पावसातच भाषण सुरू ठेवले.

अन् ‘अजितदादां’नी फेटा बांधलाच नाही, नेमकं काय होतं कारण.. वाचा सविस्तर

आजरा अर्बन बँकेचा सुवर्णमहोत्सव सांगता समारंभ व आजरा सूतगिरणीच्या नवीन इमारतीचा कोनशिला कार्यक्रम २०११ मध्ये झाला होता. या कार्यक्रमाला अजित पवार आजऱ्यात आले होते. आजरा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता असल्याचे समजताच त्यांनी शहराच्या विकासासाठी एक कोटीचा निधी दिला होता. इचलकरंजी जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न शहराच्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सुळकूड योजनेला मंजुरी दिली होती. त्यांचे वस्त्रनगरीशी अतूट नाते होते.

कोल्हापुरात पवारांचे शिक्षण

अजित पवार यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी वर्ष १९७८ मध्ये कोल्हापुरातील शहाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यावेळी शहाजी महाविद्यालय रंकाळा परिसरातील शालिनी पॅलेस येथे भरत होते. अजित पवार यांनी या महाविद्यालयात एक्स्टर्नल (बाह्य विद्यार्थी) प्रवेश घेतला होता. त्यावेळी ते १८ वर्षांचे होते. त्यामुळे ते परीक्षा असो किंवा अन्य कारणांनी ते कोल्हापुरात येत असत. त्यातून त्यांचा मित्रपरिवार तयार झाला होता. कोल्हापूरला आले की ते फियाट कार, दुचाकीवरून शहरात फेरफटका मारत असत. जेव्हा-जेव्हा ते महाविद्यालयात असत त्यावेळी ते माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या निवासस्थानी राहत होते. 

Ajit Pawar Funeral Live: अजित पवार अनंतात विलीन, दादांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला

हद्दवाढीसाठी दादा आग्रही

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याची जाणीव अजित पवार यांना होती; परंतु निर्णय घेता येत नव्हता. गतवर्षी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजवंदन समारंभात पवार यांनी या विषयाला हात घातला. दोन्ही बाजूंना विश्वासात घेऊन हा प्रश्न सोडविला जाईल, असे पवारांनी सांगितले होते. त्यानंतर ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमावेळी झालेल्या मेळाव्यात देखील पवार यांनी हद्दवाढीचा विषय काढला. एवढेच नाही तर हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूरचा विकास वाढणार नाही, याची जाणीव ठेवून दोन्ही बाजूंनी समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले होते. झटपट निर्णय घेण्यात माहिर असणाऱ्या पवार यांना घेण्यात अडचणी आल्या; परंतु हद्दवाढ झालीच पाहिजे, यासाठी त्यांनी सतत आग्रह धरला होता.

अजित पवारांमुळे रंकाळा झाला जलपर्णीमुक्त

कोल्हापुरातील रंकाळा तलाव वर्ष २००८ मध्ये जलपर्णीने पूर्णपणे वेढला गेला होता. जलपर्णी कशी काढायची, हा यक्षप्रश्न होता. अजित पवार यांना ही माहिती कळताच त्यांनी एके दिवशी सायंकाळी तलावाला भेट दिली. विजय सिंघल आयुक्त, तर उदय साळोखे महापौर होते. त्यांनी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आवाहन केले. पवार यांनी तेथेच सांगितले, मी सगळी यंत्रणा देतो, फक्त डिझेलचा खर्च महानगरपालिकेने करावा. पवारांची अट आयुक्तांनी तत्काळ मान्य केली. त्यानंतर जलपर्णी उपसण्याकरिता जलसंपदा विभागाची मोठी यंत्रे तत्काळ पोहोचली आणि रंकाळा स्वच्छतेची मोहीम सुरू झाली. आज आपण रंकाळा जलपर्णीमुक्त पाहतो तो अजित पवारांमुळे. पवार महापालिकेच्या पाठीशी उभे राहिले नसते तर रंकाळा इतिहासजमा झाला असता. लोक आजही ही आठवण जागवतात.

Web Title : अजित पवार की कॉलेज शिक्षा कोल्हापुर में: एक सिंहावलोकन।

Web Summary : अजित पवार का कोल्हापुर से गहरा नाता, आपदा राहत से लेकर विकास पहलों तक उजागर होता है। उन्होंने शाहजी कॉलेज में पढ़ाई की, करीबी संबंध बनाए रखा। उन्होंने कोल्हापुर के विकास में मदद की, जिसमें पानी के मुद्दों को हल करना और रांकाला झील की सफाई शामिल है।

Web Title : Ajit Pawar's college education was in Kolhapur: A look back.

Web Summary : Ajit Pawar's strong Kolhapur connection is highlighted, from disaster relief to development initiatives. He studied at Shahaji College, maintaining close ties. He aided Kolhapur's growth, including solving water issues and cleaning Rankala lake, showing commitment.