विधानसभेचे पडघम: ‘आजरा कारखाना' निकालाने राष्ट्रवादीला पाठबळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 01:31 PM2023-12-21T13:31:02+5:302023-12-21T13:31:21+5:30

घाटगे, आबिटकर, शिवाजी पाटील यांना करावे लागणार परिश्रम

Ajara factory results support NCP in view of Assembly elections | विधानसभेचे पडघम: ‘आजरा कारखाना' निकालाने राष्ट्रवादीला पाठबळ  

विधानसभेचे पडघम: ‘आजरा कारखाना' निकालाने राष्ट्रवादीला पाठबळ  

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्यातील राष्ट्रवादीच्या एकतर्फी विजयामुळे विधानसभेसाठी पुन्हा रिंगणात उतरणारे आ. प्रकाश आबिटकर, समरजित घाटगे आणि चंदगडचे शिवाजीराव पाटील यांना विधानसभेसाठी अधिक परिश्रम करावे लागणार आहेत. कारखान्याचे सभासद आणि विधानसभेचे मतदार यांच्यात मोठा फरक असला तरी यानिमित्ताने आजरा तालुक्यात ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने आपली मूठ आवळली आहे. ती भेदण्यासाठी या तिघांना अधिक परिश्रम करावे लागणार हे निश्चित.

आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मैदान मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकतर्फी मारले. त्यांना बिद्रीच्या विजयामुळे प्रचंड आत्मविश्वास आलेल्या के. पी. पाटील आणि विद्यमान आमदार असलेल्या राजेश पाटील यांनी ताकदीने पाठबळ दिले. या तिघांनीही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले.

या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात असलेल्या चराटी, शिंपी, शिंत्रे, रेडेकर आघाडीसोबत समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर, शिवाजीराव पाटील निवडक ठिकाणी दिसले. हे तिघेही पराभूत आघाडीच्या प्रचारासाठी जंगजंग पछाडताना दिसले नाहीत. त्यामुळेच ही आघाडी फरकाने पराभूत झाल्यानंतर या तिघांनाही आजरा तालुक्यातील आपापल्या जिल्हा परिषद मतदारसंघाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल.

उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा कागल विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या नेते, कार्यकर्त्यांनी मोठी ताकद येथे लावली. परिणामी सत्तेवर आलेल्या रवळनाथ आघाडीला ६५० चे मताधिक्य याच गटातून मिळाले. जे तालुक्यातील अन्य चार गटांतून कुठेच तुटू शकले नाही. त्यामुळे तुलनेत या ठिकाणी राष्ट्रवादी मजबूत असल्यावर शिक्कामाेर्तब झाले आहे.

आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ हा आबिटकर यांच्या विधानसभा मतदारसंघात येतो. यामध्ये पश्चिम भागातील गावांचा समावेश आहे. या गावातून चराटी यांच्या आघाडीला पाठबळ मिळाले असले तरी फरक फारसा नव्हता. त्यामुळे के. पी. पाटील यांना येथून ताकद मिळू शकते. हीच परिस्थिती कोळींद्रे जिल्हा परिषद मतदारसंघात आहे. या ठिकाणी आ. राजेश पाटील यांनी सत्तारूढच्या प्रचारात अधिवेशन असूनही हिरीरीने भाग घेतला होता. या ठिकाणाहून इच्छुक असलेले भाजपचे शिवाजी पाटील यांनाही या परिसरात अधिक राबणूक करावी लागेल.

अजून दहा महिन्यांचा कालावधी

विधानसभेची निवडणूक अजून १० महिन्यांवर आहे. वरील तिनही मतदारसंघातून एकमेकांच्या विरोधात लढू इच्छिणारे नेते हे सध्या महायुतीमध्ये बांधले गेले आहेत. परंतु एकदा का लोकसभा पार पडली की, विधानसभेवेळचे जागा वाटप कसे असेल हे अजूनही कोणालाही सांगता येणार नाही. त्यामुळे स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. त्यामुळे उर्वरित दहा महिन्यांत जोशात असलेल्या राष्ट्रवादीविरोधात हे तीनही नेते कशा पद्धतीने व्यूव्हरचना आखणार आहेत, हे महत्त्वाचे आहे.

Web Title: Ajara factory results support NCP in view of Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.