Kolhapur Politics: आता गोकुळचे मैदान मारायचे आहे, धनंजय महाडिक यांनी ठोकला शड्डू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 12:18 IST2025-08-25T12:17:58+5:302025-08-25T12:18:24+5:30
'मंत्री हसन मुश्रीफ चार वर्षांनी का होईना, पण बोलले'

Kolhapur Politics: आता गोकुळचे मैदान मारायचे आहे, धनंजय महाडिक यांनी ठोकला शड्डू
कोल्हापूर : ‘गोकुळ’ला काहींनी नजर लावण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण मागे पडायचे नाही, गोकुळचे मैदान मारतानाच जिल्हा परिषद, महानगरपालिकेतही यश मिळवायचे आहे, असे सांगत खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी दसरा मैदानात झालेल्या युवाशक्ती दहीहंडी उद्घाटन प्रसंगी शड्डू ठोकला. यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव घेता त्यांच्यावर टीका केली.
प्रतिवर्षी या दहीहंडी कार्यक्रमातून महाडिक राजकीय भूमिका मांडतात. ते म्हणाले, जिल्ह्यात दहापैकी दहा आमदार महायुतीचे निवडून दिले, तसेच आता विरोधकांच्या हातून गोकुळ पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या. वाईट नजर ठेवून मागील निवडणुकीत हा संघ बळकावला गेला. ज्यांनी मागच्या निवडणुकीत वासाच्या दुधावरून राजकारण केले. त्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ चार वर्षांनी का होईना, पण बोलले. यावरून तिथे कसा कारभार सुरू आहे, हे स्पष्ट होते.
महाडिक म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला काही दुष्ट शक्ती, खुन्नशी प्रवृत्ती, समहू विरोध करत आहेत. शहराची हद्दवाढ, शक्तिपीठ महामार्ग, विमानतळ विस्तारीकरणासाठी विरोध केला. मात्र, आता कोणी कितीही विरोध केला, तरी हे सर्व होईल. खंडपीठासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असून, आठ दिवसांतच प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
८ लाख जणांनी प्रवास केला
महाडिक म्हणाले, माजी पालकमंत्र्यांनी महाडिकांचे विमान कुठे घिरट्या घालते, अशी खिल्ली उडविली होती. मात्र, कोल्हापूरच्या विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यानंतर ८ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही केलेल्या कामाची पोचपावती आहे.
थेट पाइपलाइनचे पाणी कधी?
महाडिक म्हणाले, थेट पाइपलाइनचे काम काँग्रेसने केल्याचे सांगितले जाते. या पाण्यात माजी पालकमंत्र्यांनी फक्त स्वत: जाऊन अभ्यंगस्नान केले. मात्र, अजूनही कोल्हापूरकरांना थेट पाइपलाइनचे पाणी मिळालेले नाही.