वीरशैव बँकेची अखेर निवडणूक

By Admin | Updated: August 22, 2015 00:58 IST2015-08-22T00:58:02+5:302015-08-22T00:58:02+5:30

बिनविरोधचा प्रयत्न असफल : १८ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात

After the election of Veerashiva Bank | वीरशैव बँकेची अखेर निवडणूक

वीरशैव बँकेची अखेर निवडणूक

कोल्हापूर : येथील श्री वीरशैव को-आॅप. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी अनुसूचित जातीसाठी जागेइतकेच अर्ज शिल्लक राहिल्याने चंद्रकांत स्वामी यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित १८ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत बिनविरोधसाठी सुरू असलेले प्रयत्न फसल्याने अखेर निवडणूक लागली आहे. ६ सप्टेंबरला मतदान आणि ७ रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी ही माहिती दिली.
बँकेची निवडणूक पाच वर्षांनी होते. १९ जागांसाठी १ आॅगस्टपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली.
सर्वसाधारण गटासाठी ५१ जणांचे ७६, अनुसूचित जातीसाठी दोघांचे तीन, भटक्या विमुक्तसाठी चौघांचे ६, मागासवर्गीयांसाठी १० जणांचे १२, महिला गटासाठी आठजणांचे ११ असे ७६ जणांचे १०८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर ४५ अर्ज पात्र ठरले. या पात्र ठरलेल्या अर्जांच्या माघारीचा शेवटचा दिवस होता.
येथील पर्ल हॉटेलशेजारील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात माघारीची प्रक्रिया झाली. दुपारी तीनपर्यंत १६ जणांनी माघार घेतली. २९ जण रिंगणात राहिले.
‘लिंगायत समाजाची बॅँक’ अशी या बँकेची ओळख आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांत बॅँकेचे अधिक सभासद आहेत. बँकेची कामगिरी चांगली असल्यामुळे संचालक होण्यासाठी मोठी रस्सीखेच असते.
निवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून सुरू होता. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये दोन-तीन दशके संचालक म्हणून कार्यरत असलेल्यांना बाजूला करून नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी विरोधी परिवर्तन पॅनेलची मागणी होती. या मागणीचा विचार झाल्यास निवडणूक बिनविरोध झाली असती.
परंतु, माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत बिनविरोधसाठी दोन्ही बाजंूनी फारसे प्रयत्न झाले नाहीत. अखेरच्या दिवशी जोरदार प्रयत्न केले. मात्र, वेळ अपुरा पडल्याने शेवटी निवडणूक लागली.
सत्ताधारी विरुद्ध विरोधी अशी दुरंगी लढत होणार आहे. विरोधी पॅनेलचे अधिकृत नाव जाहीर झालेले नाही. विरोधी पॅनेलचे वसंत सांगवडेकर, दिनेश पर्वते-पाटील, एस. के. माळी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी, तर सत्ताधाऱ्यांचे नेतृत्व दिवंगत सा. रे. पाटील यांचे चिरंजीव गणपतराव पाटील, नानासाहेब नष्टे करीत आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: After the election of Veerashiva Bank