कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र की स्वतंत्र लढणार?, नेत्यांवरच ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 19:22 IST2025-05-07T19:20:53+5:302025-05-07T19:22:29+5:30

महायुती विरुद्ध इंडिया आघाडीत लढत

After a wait of three years, Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samiti elections will be held | कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र की स्वतंत्र लढणार?, नेत्यांवरच ठरणार

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र की स्वतंत्र लढणार?, नेत्यांवरच ठरणार

कोल्हापूर : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक चार महिन्यांत होणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयानेच याबाबतचा आदेश दिल्याने, आता या निवडणुका कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे इच्छुकांचे चेहरे फुलले आहेत. सध्याच्या स्थितीत महायुती विरुद्ध इंडिया आघाडी या निवडणुकीत आमनेसामने येणार हे निश्चित आहे.

२१ मार्च, २०२२ रोजी जिल्हा परिषदेमध्ये ‘प्रशासकराज’ सुरू झाले. इतर मागास आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न गेल्याने ‘तारखेवर तारीख’ सुरू होती. त्यामुळे इच्छुक नाराज झाले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अजूनही महामंडळांच्या निवडी जाहीर झालेल्या नसताना कार्यकर्त्यांना कुठेच संधी मिळत नसल्याने सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते थोडे अस्वस्थच होते, परंतु आता चार महिन्यांत निवडणुका होणार असल्याने जिल्ह्यातील राजकारणाला उकळी फुटणार आहे.

राज्यात सध्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेना एकत्र आहे, तर काँग्रेस, उद्धवसेना, शरदचंद्र पवार पक्षांसह डाव्या संघटना एकत्र आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आमदार विनय कोरे महायुतीमध्ये सहभागी आहेत. सध्याची जिल्ह्यातील राजकीय स्थिती पाहता, सर्वच ठिकाणी महायुती विरुद्ध इंडिया अशी लढत न होता गटातटाचीच लढाई होणार आहे. अशात महायुतीमध्येच काही ठिकाणी रंगतदार लढती होणार आहेत. तुलनेत इंडिया आघाडीत एकवाक्यता ठेवून लढण्यासाठी आमदार सतेज पाटील पुढाकार घेतील असे चित्र आहे.

महायुती म्हणून एकत्र

जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रपणे लढवणार असल्याचे या आधीच जाहीर केले आहे. काही ठिकाणी जर एकमत झाले नाही, तरी आम्ही स्वतंत्र लढून सत्तेच्या जोडण्या घालताना महायुती म्हणूनच एकत्रितपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जागा किती राहणार?

जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी येणारी निवडणूक होणार की, नगरपंचायतींमुळे ही संख्या कमी होणार, याबाबत मात्र अजूनही स्पष्टता आलेली नाही. यातील इतर मागासवर्गीयांचे आरक्षणही जैसे थे राहणार आहे. सदस्यसंख्या वाढविण्याचा मध्यंतरी घेण्यात आलेला निर्णय नंतरच्या काळात रद्द करण्यात आला आहे, परंतु गेल्या काही वर्षांत चंदगड, आजरा, हातकणंगले, हुपरी, शिरोळ येथे नगरपंचायती, नगरपालिका झाल्याने, त्यामुळे काही जागा कमी होणार का, हे स्पष्ट होण्यासाठी आणखी दोन महिने लागणार आहेत.

Web Title: After a wait of three years, Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samiti elections will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.