भावाच्या वाढदिवसासाठी निघालेल्या बहिणीचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST2020-12-09T04:20:57+5:302020-12-09T04:20:57+5:30

शिरोली : भावाचा वाढदिवस आणि नातेवाइकांच्या लग्नकार्यास उपस्थित राहण्यासाठी वडिलांच्या मोटारसायकलवरून माहेरी निघालेल्या महिलेचा भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू ...

Accidental death of a sister who left for her brother's birthday | भावाच्या वाढदिवसासाठी निघालेल्या बहिणीचा अपघाती मृत्यू

भावाच्या वाढदिवसासाठी निघालेल्या बहिणीचा अपघाती मृत्यू

शिरोली : भावाचा वाढदिवस आणि नातेवाइकांच्या लग्नकार्यास उपस्थित राहण्यासाठी वडिलांच्या मोटारसायकलवरून माहेरी निघालेल्या महिलेचा भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. सुमित्रा मोहन फुदाले (वय ३०, रा. कोरेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगी तनुजा फुदाले (६) व वडील रामचंद्र बापू पोवार (६०, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) हे दोघे जखमी आहेत. हा अपघात टोप येथे हाॅटेल गौरीसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.

अधिक माहिती अशी : कोरेगाव (जि. सांगली) येथील सुमित्रा फुदाले या माहेरी वरणगे पाडळीला भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वडिलांच्या गाडीवरून निघाल्या होत्या. सोबत पाच वर्षांची मुलगी तनिष्काही होती. टोपजवळ पुण्याहून कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत स्क्रॅप घेऊन निघालेल्या ट्रकने पोवार यांच्या मोटारसायकलीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात सुमित्रा या ट्रकखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला; तर मुलगी तनुजा आणि वडील रामचंद्र पोवार हे दोघे बाजूला फेकल्याने जखमी झाले. शिरोली पोलिसांनी ट्रकचालक शेरबाब गणीहुसेन फकीर यास ताब्यात घेतले आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

चौकट -

याच वेळी महामार्गावरून जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे जात होते. त्यांनी अपघात झालेल्या घटनास्थळी जाऊन जखमींना तत्काळ रुग्णालयात घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या.

फोटो ओळी ०८ सुमित्रा फुदाले

Web Title: Accidental death of a sister who left for her brother's birthday