Kolhapur: जामिनावर सुटताच पुन्हा गर्भपाताचे रॅकेट सुरू, स्वप्निल पाटील एमआरचा बनला बोगस डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 19:26 IST2025-11-26T19:26:09+5:302025-11-26T19:26:55+5:30
एकूण सात गुन्ह्यांत सहभाग, किल्लेदारही सराईत गुन्हेगार

Kolhapur: जामिनावर सुटताच पुन्हा गर्भपाताचे रॅकेट सुरू, स्वप्निल पाटील एमआरचा बनला बोगस डॉक्टर
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील बालिंगा येथे एका घरात अवैध गर्भलिंग निदान करण्याचे केंद्र चालवणारा बोगस डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील (वय ३४, रा. बालिंगा) हा सहा महिन्यांपूर्वीच अशा गुन्ह्यातून जामिनावर सुटला आहे. बाहेर येताच त्याने पुन्हा गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट सुरू केले. औषध विक्री प्रतिनिधी (एमआर) म्हणून काम करता-करता तो बोगस डॉक्टर बनून गर्भातच कळ्या खुडण्याचे काम करीत होता. अटकेतील दिगंबर मारुती किल्लेदार (४८, रा. तिटवे, ता. राधानगरी) याच्यावर देखील यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.
बालिंगा येथील गर्भलिंग निदान केंद्रावर पोलिस आणि आरोग्य विभागाने छापा टाकताच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार स्वप्निल पाटील पळून गेला. त्याचा साथीदार दिगंबर किल्लेदार अटकेत असून, त्याच्या चौकशीतून या गुन्ह्याची व्याप्ती स्पष्ट होत आहे. मुख्य सूत्रधार पाटील याच्यावर अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे सात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर अखेरचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्या गुन्ह्यातून जामिनावर सुटताच सहा महिन्यांपूर्वी त्याने पुन्हा जुनेच काम सुरू केले. एमआरचे काम करून बोगस डॉक्टर बनलेला पाटील पुन:पुन्हा हाच गुन्हा करीत असल्याने त्याला कायद्याचा धाक उरला आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कर्नाटकातून आणलेल्या गर्भलिंग तपासणी मशीनद्वारे त्याने तपासणी आणि गर्भपाताचे रॅकेट चालवले होते. कोल्हापूरसह, सांगली, सातारा जिल्ह्यांसह बेळगाव जिल्ह्यातील एजंटद्वारे त्याच्याकडे रोज १५ ते २० महिला तपासणीसाठी येत होत्या, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली.
रविवारी १७ महिलांची सोनोग्राफी
बोगस डॉक्टर पाटील आणि त्याच्या साथीदाराने रविवारी (दि. २३) १७ महिलांची गर्भलिंग तपासणी केली. यातून दोन लाख ९३ हजारांची रोकड जमा झाली होती, अशी माहिती अटकेतील किल्लेदार याने पोलिसांना दिली.
३० ते ४० हजारांचे पॅकेज
गर्भलिंग तपासणीसाठी १५ ते २० हजार आणि गर्भपातासाठी १५ ते २० हजार, असे ३० ते ४० हजारांच्या पॅकेजमध्ये काम केले जात होते. यातील काही रक्कम एजंटना दिली जात होती. बेकायदेशीर कामातून मिळवलेल्या कोट्यवधी रुपयातून पाटील याने अलिशान चार बंगले बांधल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मोक्काच्या कारवाईतून सुटला
साथीदारांच्या मदतीने गंभीर गुन्हे केल्याने जुना राजवाडा पोलिसांनी गेल्यावर्षी स्वप्निल पाटील याच्यासह त्याच्या काही साथीदारांवर मोक्काचा प्रस्ताव तयार केला होता. तो विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयास सादर केला होता. मात्र, गर्भलिंग निदान आणि गर्भपाताशिवाय इतर गुन्हे नसल्याने तो मंजूर होऊ शकला नाही, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळाली.
दाखल गुन्हे
स्वप्निल पाटील याच्यावर भुदरगड, राधानगरी, मुरगुड, शाहूवाडी, जुना राजवाडा पोलिस ठाण्यांत प्रत्येकी एक आणि करवीर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. दिगंबर किल्लेदार याच्यावर भुदरगड येथे एक आणि करवीर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.