Kolhapur News: बालिंगा येथे गर्भपात रॅकेट उघडकीस, एजंट व महिला ताब्यात; बोगस डॉक्टरचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:31 IST2025-11-25T12:31:03+5:302025-11-25T12:31:27+5:30
गर्भपात गोळ्या, सोनोग्राफी मशीन ताब्यात

Kolhapur News: बालिंगा येथे गर्भपात रॅकेट उघडकीस, एजंट व महिला ताब्यात; बोगस डॉक्टरचे पलायन
कोपार्डे : बालिंगा (ता. करवीर) येथे गर्भपात रॅकेट उघडकीस आले. त्यामध्ये एक एजंट व गर्भ तपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे. यावेळी तपासणी पथक आल्याचे समजताच बोगस डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील (रा.बालिंगा) हा पसार झाला, तर ताब्यात घेतलेल्या एजंटचे नाव दिगंबर मारुती किल्लेदार (रा. तिटवे, ता. राधानगरी )असे आहे.
या तपासणीमध्ये गर्भलिंग निदान सोनोग्राफी मशीन,९८ गर्भपात गोळ्यांचे किट, जेल असे साहित्य ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या वर रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
शाहूवाडी पोलिसांना करवीर तालुक्यातील बालिंगा येथे गर्भपात करण्यासाठी औषधे पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाली होती. शाहूवाडी व करवीर पोलिसांनी संयुक्तपणे गेली चार दिवस करवीर तालुक्यात गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जातात त्याची शोधमोहीम सुरू केली होती. त्यामध्ये बालिंगा येथे सरस्वती महिपती पार्क कॉलनीमध्ये गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जातात, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि आरोग्य विभागाच्या वतीने सापळा रचण्यात आला.
यावेळी गर्भलिंग निदान शोधमोहीम पथकाच्यावतीने एक महिला पोलीस डमी रुग्णाच्या वेशात, एक डमी एजंट गर्भलिंग निदान करत असलेल्या बंगल्यात जाऊन गर्भलिंग चाचणी करायची आहे असे सांगून माहिती घेतली. ही सर्व माहिती त्या ठिकाणी आलेल्या करवीर पोलिस व शाहूवाडी पोलिस, पथकाच्या यंत्रणेला कळविली.
शाहूवाडी पोलिस अधीक्षक अप्पासाहेब पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, करवीर महिला पोलिस अधीक्षक स्नेहल टकले, खुपिरे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधाकर ढेकळे, ॲड. गौरी पाटील या यंत्रणेने अवैध गर्भलिंग निदानसंदर्भात सापळा रचून, दुपारी एकच्या सुमारास या बंगल्यावर छापा टाकण्याची मोहीम राबविली. पोलिसांची आणि आरोग्य विभागाचे पथक आल्याचे समजताच बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील पसार झाला.
यावेळी एक एजंट व गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिलेला ताब्यात घेतले, यामध्ये एजंट दिगंबर मारुती किल्लेदार (रा. तिटवे, ता.राधानगरी) याला ताब्यात घेतले असून या छाप्यामध्ये गर्भलिंग निदान सोनोग्राफी मशीन, जेल ऑइल,गर्भपाताच्या ९८ किट इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या संशयित आरोपींवर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.