Kolhapur: जंगलात अर्धा किलोमीटर जात झाडाला एकाच दोरीने युवक-युवतीने घेतला गळफास, शेळेवाडी परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 11:42 IST2026-01-10T11:42:22+5:302026-01-10T11:42:45+5:30
चार दिवसांपूर्वीची घटना असल्याचा अंदाज

Kolhapur: जंगलात अर्धा किलोमीटर जात झाडाला एकाच दोरीने युवक-युवतीने घेतला गळफास, शेळेवाडी परिसरात खळबळ
शिरगाव : शेळेवाडी येथील ओंकार ऊर्फ उदय कृष्णात बरगे (वय २८) आणि एका अल्पवयीन मुलीने तरसंबळे (ता. राधानगरी) येथील मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर जंगलात एकाच दाेरीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याची वर्दी तरसंबळेचे पोलिस पाटील गुरुनाथ कांबळे यांनी राधानगरी पोलिसांत दिली. या घटनेमुळे राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येची घटना चार दिवसांपूर्वी झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
याबाबत राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळेवाडी येथील ओंकार ऊर्फ उदय कृष्णात बरगे व एका अल्पवयीन मुलीने तरसंबळे येथील हद्दीत जंगल परिसरामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे एका शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्याने याची माहिती पोलिस पाटील गुरुनाथ कांबळे यांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याने परिसरात दुर्गंधी येत होती. त्यामुळे तेथेच शवविच्छेदन करण्यात आले. रात्री आठच्या सुमारास दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओंकार याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
तालुक्यातील तिसरी घटना
राधानगरी तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. आमजाई व्हरवडे येथील दोघांनी कात्यायानी कळंबा या जंगलात पंधरा वीस वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा झाली होती. त्यानंतर तुरंबे - तळाशी येथे दुसरी घटना घडली होती. त्यानंतर तरसंबळे-चोरवाडी येथे घटना घडली.
गावात हळहळ
ओंकार हा अतिशय कष्टाळू व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचा बिद्री साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर सुरू आहे. गावातील यात्रेला देवालयाच्या प्रांगणात असणारी शंभर किलोची गुंडी उचलून तो दोन तीन फेऱ्या मारत होता. त्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.