Kolhapur: ‘गोकुळ’मध्ये ‘डिबेंचर’ वरून महायुतीत पडली ‘ठिणगी’?, महाडिक गट आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:48 IST2025-10-08T18:48:15+5:302025-10-08T18:48:43+5:30
एरव्ही आक्रमक असणारे हसन मुश्रीफ मात्र शांत

Kolhapur: ‘गोकुळ’मध्ये ‘डिबेंचर’ वरून महायुतीत पडली ‘ठिणगी’?, महाडिक गट आक्रमक
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाची आगामी निवडणुकीत महायुती म्हणून एकत्रित लढवण्याचा निर्धार नेत्यांनी केला होता. मात्र, सर्वसाधारण सभेत शौमिका महाडिक यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर महायुतीतील संबंध ताणले होते. डिबेंचरच्या मुद्यावरून महाडिक यांनी ‘गोकुळ’वर मोर्चा काढण्याचा इशारा देत थेट अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यावरच निशाणा साधल्याने महायुतीत आता वादाची ठिणगी पडली आहे. एकीकडे महाडिक गट आक्रमक असताना एरव्ही प्रत्येक गोष्टीवर तावातावाने बोलणारे वैद्यकीय शिक्षणमंत्री एवढे शांत कसे? याची चर्चा सध्या दूध उत्पादकांमध्ये सुरू आहे.
चार वर्षापूर्वी झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील नेत्यांना सोबत घेऊन सत्तांतर घडवले. चार वर्षे राजर्षी शाहू आघाडी एकसंधपणे काम करत असताना मे महिन्यात अध्यक्ष निवडीवरून संघात महायुतीचे राजकारण घुसले आणि समीकरणे बदलली. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याने नविद मुश्रीफ अनपेक्षितपणे अध्यक्ष झाले.
संघाच्या आगामी निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी अनेकवेळा सांगितले. त्यामुळे सर्वसाधारण सभा शांततेत होईल, असे महायुतीच्या नेत्यांना वाटले होते. पण, सभेच्या अगोदर शौमिका महाडिक यांनी कारभारावर प्रश्न उपस्थित केले. महायुतीचा अध्यक्ष असल्याने त्यांनी व्यासपीठावर यावे, अशी अपेक्षा अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केली होती. तरीही महाडिक यांची आक्रमक भूमिका पाहून सभेत गोंधळ करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नका, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी त्यावेळी केले होते. सभेत महाडिक आपल्या समर्थकांसह आल्या आणि सभासदांमध्ये बसल्या. घोषणाबाजीने गोंधळ उडाला.
पडसाद महायुतीच्या आगामी राजकारणावर उमटण्याची शक्यता
डिबेंचरच्या मुद्यावरून महाडिक यांनी कार्यकारी संचालकांना थेट घेरावच घातल्याने त्याचे पडसाद आता महायुतीतील राजकारणावर उमटू लागले आहेत. संघाची निवडणूक तोंडावर आहे, अशा वातावरणात डिबेंचरचा मुद्दा महाडिक यांनी तापवण्यास सुरुवात केल्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली असून त्याचे परिणाम निवडणुकीतील युतीवर होणार हे मात्र निश्चित आहे.
महाडिक-मुश्रीफ संबंध ताणणार?
‘गोकुळ’च्या राजकारणावरून महाडिक व मुश्रीफ यांच्यातील संबंध ताणणार आहेत. महायुतीतील इतर पक्षांची मात्र सध्या तरी सावध भूमिका आहे.