Kolhapur: का केली घाई..माझ्या मुलांचा यात काय दोष? विचारतेय आई; अपघातात मुले गमावलेली माऊली ढाळतेय अश्रू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 19:18 IST2025-05-24T19:13:56+5:302025-05-24T19:18:16+5:30
कोल्हापूर शहरातील सायबर चौकात निवृत्त प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांच्या गाडीने दिलेल्या धडकेत झाला होता मृत्यू

Kolhapur: का केली घाई..माझ्या मुलांचा यात काय दोष? विचारतेय आई; अपघातात मुले गमावलेली माऊली ढाळतेय अश्रू
कोल्हापूर : माझ्या मुलांनी खूप-खूप मोठं व्हावं, खूप शिकावं यासाठी तिने असंख्य स्वप्नं पाहिली असतील, ही आनंददायी स्वप्नं ती भरभरून जगलीही असेल. मात्र, याच स्वप्नांचा एका भरदुपारच्या टळटळीत उन्हानं चक्काचूर केला. ती दुपार ती माउली आजही विसरत नाही. ‘माझा, माझ्या मुलांचा यात सांगा काय दोष?’ असा पाझर फोडणारा सवाल करत ‘आता, कुणावर मी माया करू ?’ अशी विचारणा ती मनालाच करत आहे.
कोल्हापूर शहरातील सायबर चौकात ३ जून २०२४ रोजी निवृत्त प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांच्या गाडीने धडक दिल्याने मृत्युमुखी पडलेल्या प्रथमेश सचिन पाटील आणि हर्षद सचिन पाटील या सख्ख्या भावंडांची ही आई. या अपघातात दोन सख्खे भाऊ कोणताही दोष नसताना आईवडिलांपासून कायमचे दुरावले.
काळीज पिळवटून टाकणारा हा अपघात कदाचित कोल्हापूरकरांच्या विस्मरणात गेला असेल; पण दोन पोटच्या गोळ्यांची या अपघाताने केलेली ताटातूट ती माउली आजही विसरू शकत नाही. आज, शनिवारी तिथीनुसार या दोन भावंडांचे पहिले पुण्यस्मरण असून, त्यानिमित्ताने दौलतनगर परिसरातील त्यांच्या अभिवादनाचे फलक पाहून येणा-जाणारेही गलबलून जात आहेत.
दौलतनगरातील सचिन पाटील यांचे पत्नी, दोन मुलांचे हसतेखेळते कुटुंब. प्रथमेश बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षाला, तर हर्षद नुकताच चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झालेला. ३ जूनला ही दोन भावंडं आत्याच्या मुलासोबत दुचाकीवरून राजाराम तलावात पोहण्यासाठी जात होती. मात्र, न पोहताच माघारी येत असताना सायबर चौकात शिवाजी विद्यापीठातील माजी प्र-कुलगुरूंच्या कारने धडक दिल्याने या दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला. घरातील दोन्ही मुले कायमची गमावल्याने पाटील दाम्पत्य यातून अजूनही सावरलेले नाही. घरात, अंगणात बागडणारी दोन्ही मुले आता कधीच परत येणार नाहीत, ही भावनाच त्यांचे काळीज चर्रर्र करून टाकत आहे.