Kolhapur: उलट्या दिशेने आलेल्या अल्पवयीन कारचालकाने दुचाकीस्वारांना उडवले; एक ठार, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:13 IST2025-12-22T13:11:58+5:302025-12-22T13:13:11+5:30
मृत गोरक्षनाथच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले. घराची जबाबदारी सांभाळत असलेला गोरक्षनाथ गेल्याने पाटील कुटुंबीयांना मोठा धक्का

Kolhapur: उलट्या दिशेने आलेल्या अल्पवयीन कारचालकाने दुचाकीस्वारांना उडवले; एक ठार, एक जखमी
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळ उलट्या दिशेने आलेल्या अल्पवयीन कारचालकाने कागलच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस्वारांना उडवले. शनिवारी (दि. २०) मध्यरात्री एकच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकी चालवणारा गोरक्षनाथ प्रकाश पाटील (वय ३०, रा. गिरगाव, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेले अभिजित दिनकर खोत (३४, रा. कासारवाडा, ता. राधानगरी) हे गंभीर जखमी झाले. हे दोघे उचगाव येथील कंपनीतील काम संपवून घरी निघाले होते.
गोकुळ शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरक्षनाथ पाटील हे गेल्या वर्षभरापासून उचगाव येथील एका कंपनीत कामाला जात होते. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास काम संपल्यानंतर ते अभिजित खोत या मित्राच्या दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. खोत यांची दुचाकी पाटील चालवत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळ समोरून उलट्या दिशेने आलेल्या भरधाव कारने दुचाकीस्वारांना उडवले.
या अपघातात पाटील गंभीर जखमी झाले. सीपीआरमध्ये दाखल करताच उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. जखमी खोत यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर अल्पवयीन कारचालक कार सोडून पळून गेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पालकावरही गुन्हा
बेदरकारपणे कार चालवून अपघात केल्याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन कारचालकावर गुन्हा दाखल केला. तसेच मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला कार चालवायला देणाऱ्या पालकावरही गुन्हा दाखल केला.
पाटील कुटुंबीयांवर काळाचा घाला
गोरक्षनाथ पाटील यांच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात घराची जबाबदारी सांभाळत असलेला गोरक्षनाथ गेला. त्याच्या पश्चात पत्नी, सहा महिने आणि अडीच वर्षांची दोन मुले, आई, लहान भाऊ असा परिवार आहे. सलग दोन आघातांनी पाटील कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.