Kolhapur: माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरी छळ; कंटाळून विवाहितेने जीवन संपविले, बाळ अवघ्या सात महिन्यांत आईविना पोरके झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:30 IST2025-11-28T12:30:17+5:302025-11-28T12:30:32+5:30
म्हसवेतील दोघांना अटक : विष प्राशन केल्यानंतर सुरू होते उपचार

Kolhapur: माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरी छळ; कंटाळून विवाहितेने जीवन संपविले, बाळ अवघ्या सात महिन्यांत आईविना पोरके झाले
गारगोटी : म्हसवे (ता. भुदरगड) येथे पती आणि सासूच्या कथित छळाला कंटाळून २८ वर्षीय विवाहितेने विषप्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. अम्रिता राहुल खोत (वय २८) असे विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी संशयित पती राहुल राजेंद्र खोत व सासू अनिता राजेंद्र खोत (रा.म्हसवे) यांच्याविरोधात गारगोटी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दोघांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. याबाबत विवाहितेचे वडील अशोक गणपती पाटील यांनी तक्रार दाखल केली.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, देऊळवाडी (ता.भुदरगड) येथील अम्रिता अशोक पाटील यांचा २०२० मध्ये राहुल खोत याच्याशी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीची दोन वर्षे संसार सुरळीत चालला. मात्र नंतर पती व सासूने किरकोळ कारणांवरून मानसिक छळ सुरू केला. वारंवार माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये अम्रिताला प्रसूतीसाठी माहेरी आणण्यात आले.
त्या काळात सासू अनिता खोत हिने माहेरकडून पैसे आणण्याचा तगादा लावला. बुधवार दि.२३ एप्रिल रोजी तिला मुलगा झाला. पाच महिन्यांनी अम्रिताला परत सासरी नेण्यात आले. तेथे घर बांधण्यासाठी माहेरकडून दोन ते तीन लाख रुपये आणण्याचा पती-सासूचा दबाव वाढला. अम्रिताने नकार दिल्यानंतर ‘बाळ घेऊन माहेरी जा’ अशा धमक्या दिल्या जात होत्या.
या छळाला कंटाळून अम्रिताने १३ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. प्रकृती बिघडल्याने तिला उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने १७ रोजी कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान २३ नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश गोरे करत आहेत.
बाळ पोरके झाले...
म्हसवेतील अम्रिताने प्रेमाने संसाराची स्वप्ने उभी केली. पण विवाहानंतर वाढत गेलेला छळ, पैशांची सततची मागणी, मानसिक-शारीरिक त्रास आणि जिवाला आलेला वैताग अखेर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारा ठरला. एप्रिल २३ रोजी या संसार वेलीवर उमललेले बाळ अवघ्या सात महिन्यांत आईविना पोरके झाले आहे.