Kolhapur Crime: शेतजमिनीच्या वादातून सख्या भावावर ‘एअरगन’ने झाडली गोळी, जखमीवर उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:01 IST2025-10-16T16:00:24+5:302025-10-16T16:01:10+5:30
पाठीत गोळी लागल्याने जखमी

जखमी - सुरेश हेब्बाळे
गडहिंग्लज : शेतजमिनीच्या वादातून एकाने एअरगनद्वारे सख्या भावावर गोळी झाडली. या घटनेत सुरेश कल्लाप्पा हेब्बाळे (रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) हे जखमी झाले. बुधवारी (१५) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी चंद्रकांत कल्लाप्पा हेब्बाळे याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
पोलिसातून व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, सुरेश व चंद्रकांत यांच्यात शेतजमिनीचा वाद आहे. चंद्रकांत हा जनावरांवर औषधोपचार करतो तर सुरेश हा गवंडीकाम व शेतीकाम करतो.
बुधवारी सुरेश हा सोयाबीन कापणीसाठी गेला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास तो पाणी पिण्यासाठी घरी आला होता. त्यावेळी सुरेश व चंद्रकांत यांच्यात वादावादी झाली. दरम्यान, रागाच्या भरात चंद्रकांत याने एअरगनद्वारे सुरेशच्या पाठीत गोळी झाडली. त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा घटनेची पोलिसात नोंद झाली.