कोल्हापूर: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या २८ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 20:06 IST2022-11-25T20:05:35+5:302022-11-25T20:06:22+5:30
गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे दाखवले आमिष

कोल्हापूर: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या २८ जणांवर गुन्हा दाखल
उद्धव गोडसे
कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीसह अन्य कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकांसह २८ जणांवर आज, शुक्रवारी (दि. २५) शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कंपनीचा प्रमुख लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) याच्यासह सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील संशयितांचा यात समावेश आहे. संशयितांनी कोल्हापूर जिल्ह्यातील १६९ गुंतवणूकदारांची ४ कोटी ८९ लाख ७२ हजार ६४९ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी रोहित सुधीर ओतारी (वय २५, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली.
शाहूपुरी पोलिस आणि गुंतवणूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, ए.एस. ट्रेडर्स कंपनीने २०१७ पासून दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. सुरुवातीचे काही वर्ष ठरल्यानुसार परतावा दिला. मात्र ऑगस्ट २०२२ पासून गुंतवलेली मुद्दल आणि परतावा देणे बंद केले. कंपनीच्या कार्यालयांमध्ये वारंवार मागणी करूनही मुद्दल आणि परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे गुंतणूकदारांच्या लक्षात आले.
अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील १६९ गुंतवणूकदारंनी एकत्र येऊन कंपनीच्या विरोधात आवाज उठवला आहे. ए.एस. ट्रेडर्ससह कंपनीच्या १७ सहकंपन्यांनी गुंतवणूकदारांची ४ कोटी ८९ लाख ७२ हजार ६४९ रुपयांची फसणूक केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. महाराष्ट्रासह अन्य राज्यातही कंपनीचा विस्तार वाढला असून, देशभरातील सुमारे दोन लाख गुंतवणूकदारांची किमान दोन हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज गुंतवणूकदारांनी वर्तवला आहे.
यांच्यावर झाले गुन्हे दाखल
लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली), नासिक इस्माईल मुल्ला (पन्हाळा, जि. कोल्हापूर), सुधा सुधाकर खाडे (रा.गडहिंग्लज, कोल्हापूर), संतोष नंदकुमार कंभार (पलूस, सांगली), बापू किसना हजारे (कोल्हापूर), विक्रम जोतिराम नाळे (सांगरुळ, कोल्हापूर), रवींद्र प्रदीपराव देसाई (नागाळा पार्क, कोल्हापूर), विजय जोतिराम पाटील (रा. खुपिरे, ता. करवीर, कोल्हापूर), महेश बाजीराव आरेकर (रा. आरे, कोल्हापूर), नामदेव पाटील (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), बाळासो कृष्णात धनगर (रा. नेर्ली), अमर विश्वास चौगले (रा, गडहिंग्रलज), प्रवीण विजय पाटील (रा. गडहिंग्लज), संतोष रमेश मंडलिक (बेळगाव), युवराज तानाजी खेडकर (रा. येडेमच्छिंद्र, सांगली),
दत्तात्रय विश्वनाथ तोडकर (रा. कोडोली, पन्हाळा), शिवाजी धोंडीराम शिंदे (रा. खुपिरे, कोल्हापूर), विनायक विलास सुतार (रा. राजारामपुरी, कोल्हापूर), सुवर्णा श्रीरंग सरनाईक (शिवाजी पेठ), महेश बळवंत शेवाळे (रा. पन्हाळा), शिवाजी कुंभार (रा. कोल्हापूर), सागर पंडितराव पाटील (सांगली), चांदसो काझी (शिरोली, कोल्हापूर), प्रतापसिंह विनायक शेवाळे (रा. घुणकी, कोल्हापूर), अमित शिंदे (रा. माहिती नाही), अभिजीत साहेबराव शेळके (रा. शाहूपुरी), दीपक बाबूराव मोहिते (आरे. ता. करवीर, जि. कोल्हापूर)