Kolhapur: भांडणाचा राग; कुरुंदवाडमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून, पोलिसांनी पाठलाग करून केली तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:16 IST2025-07-08T18:13:29+5:302025-07-08T18:16:52+5:30

वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता 

A friend murdered his friend in Kurundwad kolhapur keeping in mind the anger of a fight | Kolhapur: भांडणाचा राग; कुरुंदवाडमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून, पोलिसांनी पाठलाग करून केली तिघांना अटक

Kolhapur: भांडणाचा राग; कुरुंदवाडमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून, पोलिसांनी पाठलाग करून केली तिघांना अटक

कुरुंदवाड : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्राचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय दीपक चव्हाण (वय २६) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास येथील माळभागावरील सिद्धार्थ चौकात ही घटना घडली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी दुपारी पाठलाग करून शिये फाटा परिसरात तिघा आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. यश सुनील काळे (वय १९, रा. कुरुंदवाड), अमन जमीर दानवाडे (२२, रा. त्रिशूळ चौक, गावभाग, इचलकरंजी) व श्रीजय बाबू बडसकर (२२, रा. औरवाड) अशी आरोपींची नावे असून, आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.

दरम्यान, खुनाची घटना समजताच अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे पहाटेपासून घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत चव्हाण व आरोपी यश काळे दोघे मित्र असून, किरकोळ कारणावरून शनिवारी दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी अक्षयने यशला मारहाण केल्याने याचा बदला घेण्याचा निश्चय यशने केला होता.

पीरपंजांची दहावी असल्याने रविवारी रात्री दोघेही येथील माळभागावर समोरासमोर आले होते. रागाने एकमेकांकडे पाहिल्याचे निमित्त करून यशने आपल्या इतर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने अक्षयवर चाकूने वार करून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत जीव वाचवण्यासाठी अक्षय सन्मित्र चौकात गेला. तेथील नागरिकांनी त्याला शहरातीलच खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

खुनाची घटना समजताच सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस पोलिस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. रविवारी सकाळी मृत अक्षयची मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस करीत आहेत.

अक्षय गुन्हेगारी प्रवृत्तीचा

मृत अक्षय चव्हाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. मारामारीप्रकरणी त्याच्यावर येथील पोलिसांत गुन्हाही दाखल आहे.

वाद पुन्हा उफाळणार?

खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी माळभागावर दोन गटांत पुन्हा तुंबळ हाणामारी झाली. पोलिस घटनास्थळी येताच दोन्ही गट पसार झाले. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता असल्याची चर्चा शहरात आहे.

गुन्हेगारी वाढली

शहरात गांजाची नशा करण्याचे प्रमाण वाढले असून तरुण वर्गासह अल्पवयीन मुलेही राजरोसपणे गांजांचे सेवन करत आहेत. ही घटनाही गांजाच्या नशेतच झाल्याची चर्चा शहरात आहे. पोलिसांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानेच शहरात गुन्हेगारी वाढत आहे.

Web Title: A friend murdered his friend in Kurundwad kolhapur keeping in mind the anger of a fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.