Kolhapur: रक्षाविसर्जनावरुन स्मशानभूमीत तिरडीच्या काठ्या काढून नातेवाइकांत डोके फुटेपर्यंत हाणामारी, इचलकरंजीचे चौघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 11:51 IST2025-11-27T11:50:41+5:302025-11-27T11:51:29+5:30
स्मशानभूमीत पळापळ

Kolhapur: रक्षाविसर्जनावरुन स्मशानभूमीत तिरडीच्या काठ्या काढून नातेवाइकांत डोके फुटेपर्यंत हाणामारी, इचलकरंजीचे चौघे जखमी
कोल्हापूर : येथील पंचगंगा स्मशानभूमीत बुधवारी सकाळी ११:३० च्या सुमारास रक्षाविसर्जनाला आलेल्या नातेवाइकांत काठ्यांनी डोकी फुटेपर्यंत हाणामारी झाली. यात इचलकरंजीचे चौघेजण जखमी झाले. अंत्यसंस्कारासाठी वापरलेल्या तिरडीच्या काठ्या काढून ही हाणामारी झाल्याने स्मशानभूमीतील वातावरण तणावपूर्ण बनले.
या हाणामारीत विकास रामचंद्र गेजगे (वय ५५) निवास रामचंद्र गेजगे (वय ५०), सुनंदा दगडू पारसे (वय ६५), पूजा दगडू पारसे (वय ३५, सर्व रा. इचलकरंजी) हे चौघे जण जखमी झाले. अंत्यसंस्कारासाठी उशिरा आल्याच्या कारणावरून ही हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत पोलिसांनी सांगितले की गेजगे यांची बहीण अलका बाळू करडे (वय ६०, रा. जरगनगर) यांचे २५ नोव्हेंबरला सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारीच पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी रक्षाविसर्जनासाठी सकाळी ११:१५ च्या सुमारास इचलकरंजीहून मयत करडे यांचे भाऊ व इतर नातेवाईक आले. त्यावेळी मृत करडे यांच्या नणंदेच्या मुलांनी व इतरांनी ‘तुम्ही रक्षाविसर्जनाला वेळेत का आला नाही?’ अशी विचारणा केली. यावरून वाद सुरू झाला.
स्मशानभूमीत पळापळ
शब्दाने शब्द वाढत जाऊन प्रकरण हमरीतुमरीवर आले. नंतर थेट काठ्यांनी मारहाण केली. दोन्ही बाजूकडून हाणामारी सुरू झाल्याने स्मशानभूमीत पळापळ झाली. अखेर काही नागरिकांनी आणि नातेवाइकांनी या सर्वांना शांत केले. दरम्यान, निवास गेजगे यांनी वैभव राजू पाटील, शुभम पाटील, नीलेश करडे, रेश्मा दत्ता भजनावळे आदींनी आपणा सर्वांना मारहाण केल्याचे पत्रकारांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात सांगितले.
तिरडीच्या काठ्या काढल्या
या ठिकाणी एकमेकांना जाब विचारताना बाजूला वापरलेल्या तिरड्या पडल्या होत्या. त्यातील काठ्या काढून घेऊन डोक्यात मारण्यात आल्या. त्यामुळे चौघांनाही डोक्यात जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.