चार वर्षांपूर्वी हवेत गोळीबार केला, व्हिडीओ व्हायरल होताच हणमंतवाडीच्या माजी सरपंचावर गुन्हा दाखल झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:42 IST2025-05-02T14:41:01+5:302025-05-02T14:42:14+5:30
कोपार्डे-कोल्हापूर : करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे चार वर्षांपूर्वी दसऱ्याच्या सणात बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी माजी सरपंच संग्राम ...

चार वर्षांपूर्वी हवेत गोळीबार केला, व्हिडीओ व्हायरल होताच हणमंतवाडीच्या माजी सरपंचावर गुन्हा दाखल झाला
कोपार्डे-कोल्हापूर : करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे चार वर्षांपूर्वी दसऱ्याच्या सणात बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी माजी सरपंच संग्राम हिंदुराव भापकर (वय ४२, रा. हणमंतवाडी) याच्यावर करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गावातील दूध संस्थेची निवडणूक होताच सोशल मीडियात व्हायरल झालेल्या गोळीबाराच्या व्हिडीओमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. भापकर याची बंदूक गेल्या वर्षभरापासून करवीर पोलिस ठाण्यात जमा आहे.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हणमंतवाडी येथील जय बजरंग सहकारी दूध संस्थेची निवडणूक शनिवारी पार पडली. या निवडणुकीत माजी सरपंच संग्राम भापकर यांच्या गटाने विजय मिळवला. त्यानंतर गावातील काही व्हॉट्सॲप ग्रुपवर भापकर यांनी बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यात त्यांनी दोन गोळ्या हवेत झाडल्याचे दिसत आहे. परवानाधारक बंदुकीतून सार्वजनिक ठिकाणी खुलेआम हवेत गोळीबार केल्याचा प्रकार लक्षात येताच करवीर पोलिसांनी भापकर याला बोलावून चौकशी केली.
त्यावेळी व्हायरल व्हिडीओ ऑक्टोबर २०२१मधील असल्याचे स्पष्ट झाले. बंदुकीचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलिसांनी भापकर याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच त्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करणार असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. जुना व्हिडीओ मुद्दाम व्हायरल करणाऱ्यांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.