Kolhapur: अडीच कोटींचा अपहार, बोलोलीच्या केदारलिंग सेवा संस्थेच्या संचालकांसह सचिवांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:12 IST2025-10-17T14:12:38+5:302025-10-17T14:12:55+5:30
सभासदांच्या नावे बोगस कर्ज उचलले : केडीसीसी बँकेच्या शाखाधिकारी, निरीक्षकाचाही समावेश

Kolhapur: अडीच कोटींचा अपहार, बोलोलीच्या केदारलिंग सेवा संस्थेच्या संचालकांसह सचिवांवर गुन्हा
सांगरूळ : बोलोली (ता. करवीर) केदारलिंग विकास संस्थेत संगनमताने २ कोटी ५५ लाखांच्या अपहारप्रकरणी सचिव जोतिराम कारंडे, लिपिक सुनील कांबळे, अध्यक्ष मारुती पेंडुरकर, उपाध्यक्ष कृष्णात बाटे यांच्यासह तेरा संचालक व केडीसीसी बँकेचे शाखाधिकारी संजय पाटील, निरीक्षक रणजित पाटील यांच्यावर गुरुवारी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. प्रमाणिक लेखापरीक्षक महादेव अस्वले यांनी फिर्याद दिल्यानंतर त्यातील बहुतांशी जणांना अटक केली.
सचिव जोतिराम कारंडे, लिपिक कांबळे यांच्यासह संचालकांनी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत सभासदांच्या नावे कर्जाची बोगस उचल केली होती. या अपहाराबाबत संस्थेचे सभासद सुनील बाटे यांनी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
बहुतांशी संचालक अनभिज्ञ?
बोलोलीसह वाड्यावस्त्यांतील शेतकरी सभासद आहेत. बहुतांशी संचालकांना संस्थेचा कारभारच माहिती नव्हता. प्रत्यक्षात अपहार उघडकीस आल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले.
कारंडे, कांबळे यांनी भरले ८१ लाख
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सहायक निबंधक चंद्रकांत इंगवले यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली. यामध्ये काही सभासदांच्या बँक खात्यावर कर्जाची रक्कम वर्ग झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी १ कोटी १२ लाख ९९ हजार रुपये अपहार निश्चित केला. यापैकी कारंडे व लिपिक कांबळे यांनी ८१ लाख रुपये भरल्याचे इंगवले यांच्या अहवालात म्हटले आहे.
‘लोकमत’चा पाठपुरावा
‘केदारलिंग’ संस्थेतील अपहार ‘लोकमत’नेच पहिल्यांदा सभासदांसमोर आणला. गेली सात-आठ महिने त्याचा सातत्याने पाठपुरावाही केला.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा...
जोतिराम कारंडे (सचिव), सुनील कांबळे (लिपिक), संजय पाटील (केडीसीसी बँक शाखाधिकारी आमशी), रणजित पाटील (बँक निरीक्षक), मारुती पेंडूरकर (अध्यक्ष), कृष्णात बाटे (उपाध्यक्ष), संचालक- परशराम सातपुते, आनंदा कारंडे, संभाजी बाटे, संदीप बाटे, कृष्णात जाधव, बाजीराव पाटील, रघुनाथ पाटील, धोंडीराम आडूळकर, छाया पंडित शिपेकर, सुषमा एकनाथ बाटे, छाया रघुनाथ सुतार.
यामध्ये केला अपहार...
- सभासदांच्या नावे बोगस कर्ज मंजूर - २,०४,२६,५६६
- शेअर्स रोखीने अदा - १,७०,६१५
- मेंबर शेअर्स ऐवजी ठेव रोखीने अदा - ५,९८,२१५
- अनामत खात्यात रक्कम जमा नसताना रक्कम अदा - ३,८९,८६३
- लाभांश वाटप रजिस्टरप्रमाणे जादा वाटप - १६,०२१
- खत माल विक्री रजिस्टरप्रमाणे जमा असलेली रक्कम किर्दीस जमा न घेता केलेला अपहार - २६,४००
- खर्च बिले, व्हाऊचर नसताना रक्कम अदा - १,८१,३६०
- शिल्लक रक्कम अथवा संस्थेच्या बँक खात्यात भरणा न करता केलेला अपहार - ३१,३६,७४१
- रोख शिल्लक वापरावरील बँक व्याज दराप्रमाणे (१३ टक्क्यांप्रमाणे) - ५,६३,२३९