Kolhapur Crime: दहावीतील विद्यार्थ्यांने शेजाऱ्याचे अठरा तोळे दागिने चोरले, चोरीच्या पैशातून मित्रांना दिली पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:57 IST2025-06-06T12:57:12+5:302025-06-06T12:57:34+5:30
घरात किल्ली ठेवल्याचा घेतला गैरफायदा, आठवड्यात २० हजार उडवले, अल्पवयीन ताब्यात

Kolhapur Crime: दहावीतील विद्यार्थ्यांने शेजाऱ्याचे अठरा तोळे दागिने चोरले, चोरीच्या पैशातून मित्रांना दिली पार्टी
कोल्हापूर : दहावीत शिकणाऱ्या मुलाने शेजारच्या घरातून साडेअठरा तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड चोरून मौजमजा केल्याचा प्रकार उघडकीस आला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. ५) अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीतील साडेअठरा तोळे सोने आणि २९ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत केली. याबाबत शुभांगी सुजय म्हात्रे (वय ५०, रा. पद्माराजे गल्ली, सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर) यांनी १ जून रोजी फिर्याद दिली होती.
सोन्या मारुती चौकातील शुभांगी म्हात्रे यांचे शहरात कॉफी शॉप असून, पती इचलकरंजी येथे एलआयसी कार्यालयात नोकरी करतात. २५ मे रोजी हे दाम्पत्य जोतिबाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर १ जून रोजी बेडरूममधील कपाटातील साडेअठरा तोळे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तातडीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचा तपास करताना अंमलदार तानाजी दावणे यांना फिर्यादी म्हात्रे यांच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलावर संशय आला.
घरात किल्ली ठेवल्याचा घेतला गैरफायदा
स्वच्छतेसाठी मोलकरीण येणार असल्याने म्हात्रे कुटुंबीय २५ मे रोजी शेजारच्या कुटुंबाकडे घराची किल्ली देऊन जोतिबाच्या दर्शनासाठी गेले होते. त्याच दिवशी अल्पवयीन मुलाने मोलकरीण येण्यापूर्वी म्हात्रे यांच्या घराचे कुलूप काढून चोरी केली. चोरीनंतर पहिला संशय मोलकरणीवर आल्याने पोलिसांनी तिची चौकशी केली होती.
मित्रांना मॉलमध्ये दिली पार्टी
चोरीनंतर मुलाने दागिने आणि रोकड स्वत:च्या घरावरील टेरेसवर लपवली होती. चोरीच्या पैशातून त्याने मित्रांना शहरातील एका नामांकित मॉलमध्ये पिझ्झा, बर्गरची पार्टी दिली. त्यानंतर स्वत:साठी स्पोर्ट्स शूज, फुटबॉलचे दोन किट आणि कपड्यांची खरेदी केली. आठवड्यात त्याने २० हजार ५०० रुपये उडवल्याची माहिती पोलिसांनी दिली.