Kolhapur Rain Update: मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली; कुठं, कोणत्या मार्गावर आले पाणी..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:10 IST2025-08-19T13:08:55+5:302025-08-19T13:10:27+5:30

घाट मार्गात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

80 dams in the district under water due to heavy rain in Kolhapur, Traffic closed on many routes | Kolhapur Rain Update: मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली; कुठं, कोणत्या मार्गावर आले पाणी..वाचा

Kolhapur Rain Update: मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली; कुठं, कोणत्या मार्गावर आले पाणी..वाचा

कोल्हापूर : जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांत धुवाधार पावसाने हजेरी लावली आहे. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने प्रतिसेकंद ११,५०० घनफूट व सर्वच धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी ३६.०० फुटांवरून वाहत आहे. तब्बल ८० बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. घाट मार्गात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

वेतवडे, मांडुकली, शेणवडे बंधारे पाण्याखाली, तीन घरे कोसळली

गगनबावडा : तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्याने कुंभी व सरस्वती नदीलापूर आला असून, वेतवडे, मांडुकली, शेणवडे व असळज येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर तिसंगी पैकी टेकवाडीचा थेट संपर्क तुटला आहे. यापूर्वीच कोदे, अणदूर व वेसरफ लघू प्रकल्प शंभर टक्के भरले असून, कुंभी प्रकल्प ९६ टक्के भरला आहे. 

कुंभी धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. ''कुंभी'' प्रकल्पातून एकूण १६१० क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कुंभी व सरस्वती नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तीन घरे कोसळून नुकसान

अतिवृष्टीने रविवारी दुपारी कोदे बुद्रुक येथील बाळाबाई सदाशिव संकपाळ यांच्या राहत्या घराची एक खोली कोसळली. सुदैवाने घरातील सर्व सदस्य शेतात गेल्याने जीवितहानी टळली. मात्र, घरगुती साहित्याचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मांडुकली येथील विष्णू बाबू कांबळे यांच्या घराचे छत कोसळले. सैतवडे येथील कृष्णात धोंडीराम हाप्पे यांच्या राहत्या घराचे छप्पर कोसळून नुकसान झाले.

पिरळ पूल पाण्याखाली ; जनजीवन विस्कळीत

कसबा तारळे : राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरु असल्याने भोगावती नदीला यावर्षी तिसऱ्यांदा पूर आला असून नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. दरम्यान, राधानगरीकडे जाणाऱ्या पडळी पाठोपाठ पिरळ येथील पुलावर पाणी आल्याने राधानगरीकडे होणारी वाहतूक कसबा तारळे, खिंडी व्हरवडे मार्गे वळविण्यात आली आहे. परिणामी वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी काठावरील शेतीचे मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेले आहे. 

ओढे, नदी, नाले दुथडी भरून पाहू लागले आहेत. पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसामुळे अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. विद्युत पुरवठाही वारंवार खंडित होत आहे.

दत्तवाड-एकसंबा, दत्तवाड-मलिकवाड बंधारे पाण्याखाली

नृसिंहवाडी / दत्तवाड : सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात होणारा पाऊस व धरणातून होणारे विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळी तब्बल नऊ फुटाणे वाढ झाली असून नदीचे पाणी येथील दत्त मंदिरापर्यंत पोहोचले आहे.

दत्तवाड-एकसंबा व दत्तवाड-मलिकवाड हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यावर्षी पाचव्यांदा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसात कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे काळम्मावाडी धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात पाणी वाढले असून बंधारे पाण्याखाली गेल्याने दत्तवाड-मलिकवाड व दत्तवाड-एकसंबा हे मार्ग बंद झाले आहेत.

गडहिंग्लज तालुक्यातील दोन बंधारे पाण्याखाली

गडहिंग्लज : तालुक्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीवरील निलजी व ऐनापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगाव पूल पाण्याखाली जाऊन गडहिंग्लज-चंदगडचा थेट संपर्क तुटण्याची शक्यता आहे. आजरा व आंबोली परिसरात सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे हिरण्यकेशी पात्राबाहेर पडली असून, नदीकाठच्या गावांना व नागरिकांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

करवीर तालुक्यातील सात बंधारे पाण्याखाली

कोपार्डे : करवीर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम, शिंगणापूर, कोगे खडक, बहिरेश्वर-कोगे, सांगरूळ, आरे, वरणगे-चिखली हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने व राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडल्याने करवीर तालुक्यातील चारही नदीपात्रांतील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.

महापालिकेकडून दरवर्षी शिंगणापूर बंधाऱ्याचे बरगे काढण्यासाठी दुर्लक्ष केले जाते. या वर्षीही केवळ तीन-चार थराने बरगे काढल्याने पाणीपातळी वाढून नदीकाठच्या शेतात पाणी शिरून ऊस पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शिंगणापूर, चिखली, पाडळी बु।, नागदेववाडी, हणमंतवाडी गावांतील नदीकाठावरील शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

Web Title: 80 dams in the district under water due to heavy rain in Kolhapur, Traffic closed on many routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.