उद्धव गोडसे
कोल्हापूर : शासकीय कामांच्या पूर्ततेसाठी लाच घेऊ नये आणि देऊ नये, असे सातत्याने प्रबोधन करूनही लाचखोरीचे प्रमाण कमी झालेले नाही. 'सापडला तो चोर' या विधानानुसार काही मोजकीच प्रकरणे समोर येतात. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीच्या जाळ्यात ७३ लाचखोर अडकले. यात सहा महिलांसह १३ एजंटचाही समावेश आहे. या सर्वांवर आरोपपत्र दाखल झाले असून, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्या प्रवेश द्वारातच प्रबोधनाचे फलक लावले जातात. दरवर्षी जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले जाते. सर्व शासकीय कार्यालयांत कर्मचारी आणि अधिकारी लाचविरोधी शपथ घेतात. मात्र, हे सगळे केवळ उपक्रमांपुरतेच राहते. प्रत्यक्षात फाइलवर 'वजन' ठेवल्याशिवाय कागद हालत नाहीत.
अधिकाऱ्यांनी काढलेल्या त्रुटी संपत नाहीत. असाच अनुभव अनेकांना येतो. त्यामुळे नियमाने होणारे काम करून घेण्यासाठीही नियमबाह्य पद्धतीने करून घ्यावे लागते. हा प्रकार ग्रामपंचायतपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वच विभागांमध्ये आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षात ७३ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले.
लाचेचा मोह चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच आहे. गेल्या दोन वर्षात वर्ग चारचे सहा, तर वर्ग तीनचे ३३ कर्मचारी लाच घेताना सापडले. वर्ग दोनचे १०, तर वर्ग एकचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. याशिवाय अधिकाऱ्यांसाठी लाच घेणारे १३ एजंटही कारवाईत सापडले.
तक्रारी देण्याचे आवाहन
लाचखोरी कमी करण्यासाठी लाच देणाऱ्यांनी सजग होणे गरजेचे आहे. त्यांनी एसीबीच्या कार्यालयात तक्रारी द्याव्यात. अनेकदा तक्रार आलेल्या दिवशीच त्याची पडताळणी करून लाचखोरांना सापळ्यात पकडण्याचे काम एसीबीने केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवले जाते. त्यांचे रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी मदत केली जाते. त्यामुळे निर्भयपणे तक्रारी द्याव्यात, असे आवाहन उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केले आहे.
आरोपपत्र दाखल
गेल्या दोन वर्षातील सर्व कारवायांमधील आरोपींवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केली आहेत. त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी न्यायालयात सबळ पुरावे सादर केले जातात. फिर्यादी फितूर होऊन खटला विरोधात जाऊ नये यासाठी आता एसीबीचे अधिकारीच फिर्यादी बनत आहेत.
दोन वर्षातील कारवाया
वर्ष - कारवाया - अटक आरोपी
२०२४ - २३ - ३३
२०२५ - २० - २८
२०२६ - ०७ - १२
Web Summary : Kolhapur ACB netted 73 bribe takers in two years, including six women and thirteen agents. Charges filed; court proceedings ongoing. Citizens urged to report bribery fearlessly; names remain confidential.
Web Summary : कोल्हापुर एसीबी ने दो वर्षों में छह महिलाओं और तेरह एजेंटों सहित 73 रिश्वतखोरों को पकड़ा। आरोप पत्र दाखिल; अदालती कार्यवाही जारी। नागरिकों से निडरता से रिश्वतखोरी की रिपोर्ट करने का आग्रह; नाम गोपनीय रहेंगे।